‘स्त्री’ अत्याचाराचे 92.3 टक्के प्रकरणे प्रलंबित
10 May. 2017
अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ, मुंबईत सर्वाधिक 4803 गुन्हे
पुणे – बलात्कार आणि हत्याकांडाच्या सात वर्षानंतर नयना पुजारीला न्याय मिळाला आहे. तिच्या मारेकऱ्यांना दोषी ठरवून न्यायालयाने मंगळवारी फाशीची शिक्षा सुनावली. संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या या घटनेचा निकाल तब्बल सात वर्षानंतर सत्र न्यायालयात लागला. न्याय मिळायला विलंब झाला तरी आरोपींना फाशीची शिक्षा झाल्याने न्यायालयाच्या निर्णयाचे सर्वच स्तरावरुन स्वागत करण्यात येत आहे. मात्र राज्यातील इतर घटनांचा विचार करता अद्यापही स्त्रियांवरील अत्याचाराचे 92.3 टक्के गुन्हे विविध न्यायालयात प्रलंबित असल्याची वस्तुस्थिती आहे.
महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसे-दिवस वाढ होताना दिसत आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या पाठोपाठ नोकरी करणाऱ्या महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रकारही मागील काही वर्षात वाढत आहेत. पुणे शहरात नयना पुजारी खून खटल्यानंतर नोकरी करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा खरा प्रश्न पुढे आला. यानंतर विविध राजकीय पक्षांनी नोकरी करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी आंदोलने केली. तसेच सभागृहात याबाबत प्रश्न मांडले.
यातून आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसंदर्भात नियमावली तयार केली गेली. मात्र या नियमावलीकडे कंपन्या दुर्लक्ष करत असल्याने नयना पुजारी प्रकरणानंतर आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या खूनाच्या व अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या. नुकतेच घडलेले प्रकरण म्हणजे रसिला राजू खून प्रकरण. आयटी कंपन्या अद्यापही महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंदर्भात गंभीर नसल्याचे दिसते. कॅबला जीपीएस सिस्टीम तसेच कंपनीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अशा काही मोजक्या उपाययोजना केल्या गेल्या आहेत. मात्र उपाययोजना वरवरच्या असल्याचे दिसून येते.
राज्याचा विचार करता स्त्रियांवरील अत्याचारात 16.57 टक्के वाढ झालेली आहे. यामध्ये मुंबईत सर्वाधिक 4803 गुन्हे घडलेले आहेत. महिलांच्या अपहरणामध्ये (+107.41 टक्के) वाढ झाल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अहवालात आढळते. या अहवालात असे दिसून आले आहे की कौटुंबिक हिंसाचारात वाढ झाली आहे. महिलांवरील अनैतिक मानवी तस्करी (+88 टक्के), बलात्कार (+ 20.5 टक्के), विनयभंग (+17.1 टक्के) आणि हुंडा प्रतिबंधक कायदा (+7.6 9 टक्के) वाढ दिसून येते.2014 मध्ये बलात्काराच्या खटल्याचा निकाल 19 .1 टक्के होता, जो 2015 मध्ये वाढून 21.10 टक्के झाला आहे.
जागरुकतेमुळे तक्रारी दाखल
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जास्तीतजास्त जागरुकतेमुळे महिला तक्रारी दाखल करण्यासाठी पुढे येत आहेत. ज्यामुळे राज्यातील महिलांच्या विरोधातील गुन्हे नोंदणीची संख्या वाढत आहे. स्त्रियांच्या विरोधात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे, परंतु या प्रकरणात दोषी ठरण्याचे फारसे नाही. कारण न्यायालयात खटला अनेक वर्षे सुरु असतो. स्त्रिया त्यास सामोऱ्या जाऊ शकत नाहीत. कारण त्यापैकी बहुतेकजण लग्न करतात किंवा इतर कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असतात.
स्त्रियांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांचे प्रमाण 2015 मध्ये 54.80 टक्के आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर महिला स्वत:हून तक्रार देण्यास पुढे येत आहेत.
राज्यात स्त्रियांवरील अत्याचाराच्या दाखल झालेल्या गुन्हयांचा विचार करता सर्वात मोठा वाटा मुंबई शहराचा(15.45%) तर त्यानंतर पुणे शहराचा (6.33%) आहे.
2014 मध्ये बालात्काराचे एकूण 4144 गुन्हे घडले आहेत.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111



