👁 10 Views

शाळकरी मुलांना आहारात अंडी देणे घातक डॉ. कल्याण गंगवाल; जंकफुडप्रमाणे अंड्यावरही बंदी घालण्याची मागणी

पत्रकार परिषदेत माहिती देताना डॉ. कल्याण गंगवाल.

पुणे : अंड्यातून केवळ १३.५ टक्केच प्रोटिन्स मिळतात. त्यामध्ये २०० मिलिग्रॅम पेक्षा अधिक कोलेस्ट्रॉल असते. त्यातून ऍलर्जी, टायफॉईड आणि इतर रोगांचा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे माध्यान्ह भोजनातून शाळकरी मुलांना अंडी देणे हे आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. अंड्यांविषयी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासातून आणि तज्ज्ञांच्या संशोधनातूनही अंडी मानवी आरोग्याला नुकसानकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे,” अशी माहिती सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी दिली. तसेच, आजारांना निमंत्रण देणाऱ्या अंड्यावरही जंकफूडप्रमाणे बंदी घालावी, अशी मागणीही डॉ. गंगवाल यांनी केली.

पुणे महानगरपालिकेने गेल्या आठवड्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत महापालिकेच्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनात उकडलेली अंडी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. कल्याण गंगवाल बोलत होते.

डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “राज्यातील शाळा, अंगणवाडीतील विद्यार्थी व माता याना पोषक आहार म्हणून उकडलेली अंडी देण्याबाबत हालचाली सुरु आहेत. वास्तविक अंड्यातून कुठलेही पोषक घटक मिळत नाहीत. पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांवर अँटिबायोटिक्स, हार्मोन्सचा मोठा मारा होतो. शिवाय अंड्यांची उत्पत्ती अधिक व्हावी, याकरिता अनैसर्गिक प्रक्रिया केली जाते. अंडी शिळी की ताजी, याचीही आपल्याला माहिती नसते. त्यामुळे त्यातून अनेक रोगांना निमंत्रण मिळते.”

काय होतात आजार
अंड्याच्या सेवनामुळे सालमोनेला (टायफॉईडचा ताप), ऍलर्जी, सर्दी, दमा, त्वचारोग, फूड पॉइजनिंग, पचन प्रक्रियेत बिघाड आदी आजार बळावतात. अनेक घातक अंश शरीरात येत असल्याने ह्रदयविकार होण्याची शक्यता अधिक असते. अंडी शाकाहारी नाहीत. अफलित अंड्यातील जिवंत स्त्रीबीजाला आपण मारतो. अशा हिंसक आहारामुळे मानसिक आरोग्यही बिघडते.

संशोधन काय सांगते
नोबेल पारितोषिक विजेते डॉ. ब्राऊनर व डॉ. गोल्डस्टीन यांच्या संशोधनातून हृदयरोग्यांना अंडी घातक असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोंबड्यांच्या आरोग्याची कोणतीही तपासणी होत नाही. त्यामुळे बर्ड फ्लू, गंबोरा यासारखे आजार त्यांना होतात. त्या कोंबड्या मारल्या जातात. मात्र, त्यांची अंडी बाजारात विकली जातात. त्यातून अनेक रोगांना आमंत्रण मिळते. अफलित अंडी शाकाहारी म्हणून विकणे सामाजिक गुन्हा असल्याचा निकाल एडव्हर्टायजिंग स्टँडर्ड्स कौंसिल ऑफ इंडियाने २६ में १९९० रोजी दिला आहे. हाफकिन इन्स्टिट्यूटच्या सल्ल्यानुसार ५ वर्षाच्या मुलांपर्यंत तर अंडी देऊच नयेत.

अंड्याला पर्याय काय?
पोषण आहारात अंड्याला पर्याय म्हणून गुळ-शेंगदाणे, गाईच्या दुधात शतावरी पावडर, सुकडी, दूध व केळी, चिक्की, राजगिरा लाडू, मका हे पदार्थ अधिक आरोग्यकारक आहेत. कडधान्ये, डाळी व सोयाबीन यामध्ये भरपूर प्रोटिन्स असतात. पालेभाज्या अधिक पोषक आहेत.

अंड्याचा प्रचार दिशाभूल करणारा
व्हिटॅमिन्स, प्रोटिन्ससाठी अंडी खाण्याचा प्रचार दिशाभूल करणारा आहे. अंड्याला शाकाहारी म्हणून व्यापारी दिशाभूल आणि विज्ञानाशी प्रतारणा केली जात आहे. पशुसंवर्धन विभागाने पाठविलेला प्रस्ताव केवळ कुक्कुटपालन व्यवसायाला बळकट करण्याच्या उद्देशाने केलेला आहे. काही वर्षांपूर्वी मागच्या सरकारनेही असा निर्णय घेतला होता व नंतर तो सामाजिक रेट्यामुळे बदलला होता. जगभर अंड्याचे दुष्परिणाम दिसू लागल्याने हा उद्योग वाचविण्यासाठी अंडी शाकाहारी आणि आरोग्यास हितकारक असल्याचा अपप्रचार केला जात आहे. अंड्याचा खप वाढविण्यासाठी महात्मा गांधींचा वापर होणे हे शरमेची बाब आहे.

मुख्यमंत्र्यांना निवेदन
अंडी आरोग्यास घातक असून, शाळकरी मुलांना आहारातून अंडी देऊ नयेत, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना निवेदन दिले आहे. यावेळी राज्यसभा खासदार अजयकुमार संचेती आणि आमदार राजेंद्र पाटणी हेदेखील उपस्थित होते. मध्यप्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी अंगणवाडी आणि शाळकरी मुलांना अंडी न देण्याचा प्रस्ताव पारित केला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही अंडी देऊ नयेत, याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे डॉ. गंगवाल यांनी केली आहे.

डॉ. कल्याण गंगवाल (एमडी-मेडिसिन),
संस्थापक- सर्व जीव मंगल प्रतिष्ठान
९८२३०१७३४३

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *