👁 13 Views

किनारपट्टीवरील उद्योगांना मेरी टाईम बोर्डाने सहकार्य करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 11 : किनारपट्टीवर सुरु असलेल्या आणि नव्याने येणाऱ्या उद्योगांना मेरी टाईम बोर्डाने संपुर्ण सहकार्य करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मेरी टाईम बोर्डाची 72 वी आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झाली, यावेळी ते बोलत होते. यावेळी बंदरे विभागाचे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, किनारपट्टीवरील उद्योग-व्यवसाय वाढला पाहिजे, नवीन येणाऱ्या उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करुन पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत.
प्रारंभी मेरी टाईम बोर्डातर्फे सुरु असलेल्या विविध प्रकल्पाबाबत सादरीकरण करण्यात आले. त्यात सागरमाला योजनेअंतर्गत सुरु असलेले प्रकल्प, नव्याने बांधण्यात आलेल्या जेट्टी, नव्याने सुरु करण्यात येणारे जलमार्ग, समुद्रकिनारी सुरु असलेले विविध खेळ, जेट्टीचा वापर करण्यासाठी विविध कंपन्यांशी करण्यात आलेले करार, प्रवाशी वाहतुकीची सद्य:स्थिती आणि सुरक्षा, वाढवण बंदराचा विकास, तुर्भे येथे बहुउद्देशिय जेट्टी निर्माण करणे, सागरी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची स्थिती जाणून घेणे, जयगड खाडीत शिपयार्ड प्रकल्पाची उभारणी, नरीमन पॉइंट ते बोरीवली तसेच ठाण्याच्या खाडीत जलवाहतुक सुरु करणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येकी एक नवीन बंदर सुरु करणे, बंदर हद्दीत विनापरवानगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या मालकावर दंडात्मक कारवाई करणे, नागपूर जिल्ह्यातील तलावांमध्ये सी-प्लेन सुविधा निर्माण करणे आदींचा आढावा घेण्यात आला.

या बैठकीस मेरी टाईम बोर्डाने राबविलेल्या विविध उपक्रमांवर आधारित चित्रफित, पुस्तिका व दिनदर्शिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, मेरी टाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पाटणे, भारतीय नौसेना प्रतिनिधी कमांडर ए.के.अग्रवाल उपस्थित होते.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *