महावितरणच्या “नवप्रकाश योजने’त 23 हजार वीजग्राहकांचा सहभाग
-31 जुलै 2017 पर्यंत सुरू राहणार योजना
बारामती, दि. 10 (प्रतिनिधी) – थकित देयकांमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी सुरू असलेल्या “नवप्रकाश योजने’स ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. या योजनेत आतापर्यंत बारामती परिमंडलातील 23 हजार 171 ग्राहकांनी सहभाग घेतला आहे. त्यांनी 9 कोटी 89 लाख 64 हजार रुपयांची थकबाकी भरली आहे.
महावितरणने कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या सार्वजनिक नळयोजना ग्राहक वगळून इतर सर्व उच्च व लघुदाब थकबाकीदार ग्राहकांसाठी नोव्हेंबर महिन्यापासून नवप्रकाश योजना सुरू केली आहे. येत्या जुलै 2017 पर्यंत मुदत असलेल्या या योजनेतून थकबाकीमुक्तीची व विनाशुल्क नवीन वीजजोडणीची संधी थकबाकीदारांसाठी उपलब्ध झालेली आहे. नवप्रकाश योजनेत 31 जुलै 2017 पर्यंत मूळ थकबाकीसोबत 25 टक्के व्याजाच्या रकमेचा भरणा करावा लागणार असून, उर्वरित 75 टक्के व्याज आणि 100 टक्के विलंब आकाराची रक्कम माफ होणार आहे.
या योजनेत 31 मार्च 2016 पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या कृषीपंपधारक, घरगुती, वाणिज्यक व औद्योगिक, तसेच इतर वर्गवारीतील (सार्वजनिक नळयोजना ग्राहक वगळता) वीजग्राहकांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय लोकअदालत किंवा न्यायप्रविष्ट असलेल्या थकबाकीच्या प्रकरणातील थकबाकीदारांना सहभागी होता येणार आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणात हुकुमनामा (डिक्री) मंजूर होऊन 12 वर्षांपेक्षा अधिक झाली असल्यास अशा ग्राहकांनाही या योजनेत सहभागी होता येईल.
महावितरणच्या ुुसंकेतस्थळावर संबंधित ग्राहकांच्या थकित देयकाचा तपशील व नवप्रकाश योजनेत किती रक्कम भरायची याबाबत माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. थकबाकीची रक्कम धनादेशाद्वारेही स्वीकारली जाणार आहे. थकबाकीमुक्त वीजग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार त्वरित नवीन वीजजोडणी देण्यात येईल. त्यासाठी सुरक्षा ठेव, सर्व्हिस कनेक्शन चार्जेस, रिकनेक्शन चार्जेसमधून सूट देण्यात येणार आहे. तथापि, सुरक्षा ठेवीची रक्कम वर्षभराच्या वीजवापरानुसार आर्थिक वर्षात आकारण्यात येणार आहे. थकित देयकांमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या वीजग्राहकांनी थकबाकीमुक्त होण्यासाठी या योजनेचा लाभ घ्यावा आणि महावितरणच्या संबंधित शाखा वा उपविभाग कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
“नवप्रकाश योजने’त आतापर्यंत बारामती मंडलांतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर आणि भोर तालुक्यातील 5 हजार 462 वीजग्राहकांनी 3 कोटी 52 लाख 82 हजार रुपये, सातारा मंडलातील 5 हजार 397 वीजग्राहकांनी 1 कोटी 12 लाख 38 हजार रुपये, तर सोलापूर मंडलातील 12 हजार 312 वीजग्राहकांनी 5 कोटी 24 लाख 44 हजार रुपयांची मूळ थकबाकी भरली आहे. त्यांना या योजनेनुसार व्याज तसेच विलंब शुल्क माफ करण्यात आले आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111



