पंढरपूर दि.12 :- सांगोला तालुक्यात पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता. टंचाईवरील उपाययोजनेसाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि जनता यांनी सांघिकरित्या समन्वयाने काम करावे. त्यासाठी गावपातळीवर पोहचा असे निर्देश कृषि व फलोत्पादन,पणन आणि पाणि पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले.
सांगोला तालुक्यातील कृषि व फलोत्पादन पणन आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांची आढावा बैठक अहिल्यादेवी स्मृती भवन सांगोला येथे संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार गणपतराव देशमुख, नगराध्यक्षा राणीताई माने, पंचायत समितीचे सभापती श्रीमती मायाक्का यमगर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. बिराजदार, तहसिलदार संजय पाटील, गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे तसेच सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीस विविध बाबींचा आढावा घेतल्यानंतर बोलताना राज्यमंत्री खोत म्हणाले की, तालुक्यात तीव्र उन्हामुळे पाणी टंचाई लवकर जाणवू लागली आहे. त्यामुळे प्रशासनावर मोठी जबाबदारी आली आहे. यासाठी पाणी टंचाईच्या उपयोजनेबाबतचा संबधित विभागांनी आराखडा तयार करावा. तसेच संबधित विभागांनी लोकप्रतिनिधी,सरपंच, ग्रामसेवक यांच्या बैठकी घेवून उपाययोजनेबाबत तात्काळ कार्यवाही करावी.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या योजना जनतेसाठी असून, त्या तात्काळ कार्यान्वित कराव्यात तसेच सुरु असलेल्या योजनांच्या देखभाल दुरुस्तीसाठी लागणा-या निधीचा प्रस्ताव सादर करावा. नगरपालिेकेने वाढीव गावांच्या पाणी पुरवठा योजना, नगरोत्थान मधून रस्ते, भुयारी गटारे, पाणी, दलित सुधार वस्तीचा आदींचा प्रस्ताव सादर करावा असेही राज्यमंत्री खोत यांनी सागितले.
ग्रामस्वच्छता अभियानाच्या यशस्वितेसाठी संबधित विभागांनी समन्वयाने काम करावे यासाठी लोकप्रतिनिधीपासून विविध घटक, सामाजिक संस्थाचा सहभाग घ्यावा असे निर्देशही राज्यमंत्री खोत यांनी दिले. महसूल विभागाने मंडलनिहाय समाधान योजनेच्या मेळाव्याचे आयोजन करुन ग्राम पातळीवर दाखले उपलब्ध करुन द्यावेत.कृषि विभागाने खरिपपूर्व हंगामासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी. शेतक-यांना पेरणीसाठी लागणारे बि-बियाने, खते, औषधे यांचा साठा उपलब्ध करावा तसेच बोगस बि-बियाणे व खते विक्रेत्यांवर कारवाई करावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच जलयुक्त शिवार योजनेतून तालुक्यात झालेल्या कामांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी आमदार गणपराव देशमुख यांनी विविध मुद्दे उपस्थित केले. त्यामध्ये पाणी पुरवठा,सिंचन योजना,कृषि, वीज आदी बाबींचा समावेश होता. तसेच कोरडा व माण नदीला कॅनॉलचा दर्जा मिळावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. या बैठकीस जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य नगरसेवक तसेच ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111



