महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांवर शेरेबाजी केली व त्यांचा पक्ष बऱ्यापैकी अडचणीत आला. तरीही शेतकऱ्यांशी ‘संवाद’ साधणाऱ्या आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ‘संघर्ष’ यात्रेला प्रत्युत्तर म्हणून काढण्यात येणाऱ्या भाजपच्या ‘संवाद यात्रे’चे नेतृत्व दानवे यांच्याकडेच राहणार आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आकुर्डीत पत्रकारांशी बोलताना याबाबतचे सुतोवाच केले.
एका खासगी रुग्णालयाच्या कार्यक्रमासाठी आकुर्डीत आलेल्या पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दानवे यांच्या संदर्भात ते म्हणाले, शेतकऱ्यांविषयी केलेले ते विधान दानवे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून केले होते. त्यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. मात्र, आपण प्रसारमाध्यमांना दोष देणार नाही. दानवे शेतकरी कुटुंबातील आहेत. ग्रामपंचायत ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. हा प्रवास शेतकऱ्यांच्या तसेच सर्वाच्या पाठिंब्यातूनच झालेला आहे. भाजपच्या ‘संवाद यात्रे’चे नेतृत्व दानवे हेच करणार आहेत. विरोधकांकडून दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली असली तरी विरोधकांचे ते कामच आहे. भाजपमध्ये कोणत्याही प्रकारची गटबाजी नाही, असा दावाही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात केला. राजू शेट्टी यांच्या ‘आत्मक्लेश यात्रे’विषयी पाटील म्हणाले की, जे घटक पक्ष आहेत, त्यांना स्वत:चा पक्ष वाढवण्याची पूर्ण मुभा आहे. त्यांचे म्हणणे मांडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य त्यांना आहे. हीच खरी लोकशाही आहे. त्यामुळे त्यांच्या आंदोलनापासून त्यांना रोखणार नाही.
चिंचवडला भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी संवाद यात्रेची घोषणा केली. शेतकऱ्यांच्या मुद्दय़ांवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते नकारात्मक वातावरण तयार करत असल्याने त्यांच्या संघर्ष यात्रेला प्रत्युत्तर म्हणून भाजपकडून संवाद यात्रेचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकांना आपल्याकडून संवाद हवा आहे. त्यासाठी आपण गावोगावी जाणार आहे. हा संवाद शिवारात जाऊन व्हायला हवा. जवळपास २५ लाख शेतकऱ्यांशी आपल्याला संवाद साधायचा आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यानंतर, तूरडाळीच्या मुद्दय़ावर दानवे यांनी शेतकऱ्यांवर शेरेबाजी केल्याने भाजप अडचणीत सापडला. मात्र, भाजपने त्यांच्याकडेच संवाद यात्रेचे नेतृत्व सोपवले आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





