👁 11 Views

फडणवीस सरकार म्हणजे ‘काम कमी, बोलणेच जास्त’

.. तर, शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली नसती – राजू शेट्टी

शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेण्याची केंद्र व राज्य सरकारची पद्धत वेगळी आहे. राज्य सरकारचे ‘काम कमी, बोलणे जास्त’ आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची राज्य सरकारला जाण नसून ते समाजावून घेण्याची त्यांची तयारीही नाही, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी चिंचवडला पत्रकारांशी बोलताना केली. हमीभाव देण्याचे व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन तीनवर्षांपूर्वी पंतप्रधानांनी दिले होते, ते पाळले असते तर शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली नसती, असेही ते म्हणाले.

शेतकरी अस्वस्थ असल्यामुळेच आत्महत्यांमध्ये वाढ होत असल्याचे सांगून खासदार शेट्टी म्हणाले, ‘अच्छे दिन’च्या भुलथापांना शेतकरी एकदा भुलले. दोन वर्षांनंतर पुन्हा शेतकऱ्यांच्या दारात जावे लागणार आहे, याचे भान राज्यकर्त्यांनी ठेवावे. सरकार शेतकऱ्यांचा शेतीमाल विकत घेते म्हणजे उपकार करत नाही. पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना डाळीच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचे व मोठय़ा प्रमाणात उत्पादन करण्याचे आवाहन केले होते, त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात तूरडाळ व हरबऱ्याचे उत्पादन केले. त्याचे बक्षीस मिळण्याऐवजी शेतकऱ्यांची फरफट झाली. शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनीच ‘नाफेड’ला मागच्या दाराने तूरडाळ विकली. राज्य शासनाने शेवटच्या दाण्यापर्यंत तूरडाळ खरेदी करण्याची घोषणा केली आहे, हा शब्द त्यांनी पाळला पाहिजे. कारण, ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ‘संघर्ष’ यात्रेला सरकारकडून ‘संवाद’ यात्रेने प्रत्युत्तर दिले जाणार असले तरी, तो संवाद होतोय की विसंवाद हे काळच ठरवणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे शेतकऱ्यांविषयीचे वक्तव्य असंवेदनशील, बेजबाबदार असून शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करणारे आहे, असेही शेट्टी म्हणाले.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *