एक वळीव असाही !
असाच एक उन्हाळा. रणरणती दुपार. तो असाच ओढ्याकडेने फिरत असलेला. फिरत फिरत एका झाडाखाली स्थिरावलेला. चिंचेचं झाड. हिरवीगार थंड सावली. चिंचेचा मोहर जमीनभर पसरलेला.पिवळसर तांबूस गालीचाच जणू ! त्यानं गालिच्यावर अलगद पाठ टेकली. झाडाच्या फांद्यांमधून चाललेला ऊनसावलीचा खेळ पाहता पाहता त्याचा कधी डोळा लागला समजलंच नाही!
कसल्यातरी आवाजानं त्याला जाग आली. त्यानं डोळे किलकिले करून पाहिलं. समोर अंधारून आलेलं. अरेच्चा !…संध्याकाळ झाली की काय? तो आश्चर्यचकित होऊन उठून बसला. त्यानं डोळे मोठे करून आभाळाकडे पाहिलं. आकाशात ढगांची गर्दी झाली होती. दूर कुठंतरी ढगांच्या गरजण्याचा आवाज येत होता. तो उठला. मोकळ्या जागेत आला. बांधावरून चालता चालता त्याला जाणवलं की आभाळ अंधारून आलं असलं तरी हवेत अजून भलताच उकाडा आहे ! आता या वेळी पाऊस पडला तर? घामानं चिपचिपलेलं अंग आणि उन्हानं भेगाळलेली जमीन दोघांनाही आता पावसाची खूप गरज आहे. धो धो कोसळणं राहो पण पावसाची एखादी सर आली तरी छान होईल!
इतक्यात एक प्रकाशशलाका काळोख भेदून गेली. त्या विद्युलतेच्या चमकण्यानं अख्ख्या गगनमंडपाचे दोन भाग झाले. तो तीव्र प्रकाश पाहून त्याची पावलं जागेवर थिजली. पाठोपाठ जोरदार मेघगर्जना. अरेच्या ! वीज चमकल्या चमकल्या आवाज. म्हणजे पाऊस अगदी जवळच आलेला आहे !
तो आता मोकळया कुरणात आला. देवा, पाऊस पडू दे रे ! …त्याच्या मनात आता एक अनामिक हुरहूर दाटली होती. तो आशाळभूत नजरेनं आकाशाकडे पाहत होता….. इतक्यात एक थेंब त्याच्या गालावर पडला. टप्प. एक गोड शिरशिरी त्याच्या अंगात शिरली. एक थंडावा! इतक्यात दुसरा थेंब , इतक्यात तिसरा. टप टप टप. त्याच्या मनाचा मोर थुईथुई नाचू लागला. किती हे सुख ! तो जसा भिजत होता त्याच्या मनाची हुरहूर वाढत होती ! कितीतरी वर्षं झाली पण ही हुरहूर अशीच टिकून आहे !.. ज्या ज्या वेळी हा वळवाचा पाऊस येतो तेव्हा तेव्हा त्याची गत अशीच व्हायची. त्याचं मन काही काळापुरतं आनंदी व्हायचं पण काही वेळातच ते कातर व्हायचं. वेदनेनं हुळहुळायचं. रक्तबंबाळ होऊन डोळ्यांतून वाहायचं. पंख कापलेल्या पाखरासारखी नुसती फडफड.
दहावीची परीक्षा संपली तेव्हा तो असाच या कुरणात आलेला. याच चिंचेखाली झोपलेला. तेव्हाही असंच कडक ऊन पडलेलं. त्याला जाग आली तेव्हा ती जवळ उभी होती. तिनंच त्याला जागं केलं होतं. त्यानं डोळे उघडले तेव्हा असेच ढग दाटून आले होते.
“मी उद्या जातेय.” झाडाच्या बुंध्यावरून हात फिरवत, पायानं मोहराच्या गालिच्यावर पायानं नक्षी काढत तिनं म्हटलं होतं.
“माहिताय.”तो एकच शब्द बोलला.
“तुला सोडून जाताना खूप वाईट वाटतंय.”
“मलाही.” त्याच्या गळ्यात हुंदका आला होता.
“आपण आयुष्यभर एकत्र राहू असं वाटत होतं!”
“मला तर अजूनही वाटतंय.”
“नाही जमणार !….मी चाललेय कायमची…..पुन्हा भेट होईल न होईल.”
“असं का म्हणतेस?”
“मामा पुण्याला जातोय नोकरीसाठी….. तेव्हा मलाही आता माझ्या घरी गेलं पाहिजे.”
“पण आजी आहे की !….तू आजीजवळ राहून कॉलेज कर ना !”
“हो पण माझे आईबाबा ऐकायला नकोत का?….आणि या गावात कॉलेज आहे कुठं ? रोज वीस किलोमीटर जायचं आणि यायचं!… म्हातारीच्या जीवावर मला एकटीला ते सोडणार नाहीत.”
“प्रयत्न तर कर…. आईवडिलांना सांगून बघ. सोबतीला मैत्रिणी आहेत म्हणावं.”
“पण त्यांनी ऐकलंच नाही तर?”
“ए, असं बोलू नको.” त्याच्या अश्रूंचा बांध फुटला. ते त्याच्या गालावर ओघळले.
“ए चल, इथं जास्त वेळ थांबायला नको. कुणीतरी बघितलं तर शेवटच्या दिवशी गोंधळ नको. घरी गेले की मी सविस्तर पत्र लिहते.”
“अगं, थांब ना थोडावेळ. तुला डोळे भरून पाहून तर घेऊ दे.”
“एवढे दिवस काय डोळे बंद करून पाहत होतास काय?” त्याही अवस्थेत ती खुदकन हसली.
“तू म्हणजे वळवाचा पाऊस आहेस. आलीस की अंग अंग मोहरून जातं. तू म्हणजे तापलेल्या जीवाचा थंडगार शिडकावा आहेस.”
“बास, बास !….जास्त बोलू नको !…..नाहीतर खरोखरचा पाऊस यायचा !”
ते दोघेही घराच्या दिशेने निघाले. चार पावलं गेले असतील तोपर्यंत तडतड आवाज करत थेंब पडू लागले. थेंब म्हणता म्हणता गारा पडू लागल्या. एक एक गार तिच्या बुबुळाएवढी. मार बसू लागला तशी ती विव्हळली. वेदनेनं त्याच्याकडे पाहू लागली.
तो पुढं झाला. त्यानं तिला आपल्या मिठीत घेतली. तिला वाकवून त्यानं तिच्या अंगावर स्वतःच्या अंगाचं आच्छादनच केलं. बऱ्याच वेळ गारा पडत राहिल्या. मग पाऊस कोसळू लागला. मुसळधार पाऊस. थंडगार वारा. पण त्या दोघांनाही त्याची जाणीवच नव्हती. त्यांना जाणवत होतं ते फक्त एकमेकांचं आस्तित्व.
धरणीच्या अंगाशी अवखळपणे झोंबणारा वळीव थांबला. धरणी तृप्त झाली. तीही उठली. तिनं स्वतःला त्याच्या मिठीतून सोडवून घेतलं. त्यानंही आपल्या शरीराची कमान बाजूला केली. त्यानं तिचा चेहरा उचलला. तिच्या गालावर मावळतीचा लालिमा. हा थेंबांचा परिणाम, थंडीचा की प्रेमाचा?
ती गेली……अंगावरून वाऱ्याची झुळूक जावी तशी. कधीही परत न येण्यासाठी.
वळीव तर वर्षालाच येतो. येतो तिची आठवण घेऊन…..आणि जातो मनाला विद्ध करून ! वळीव आला की हुरहूर नाही आला तरी हुरहूर !…..हे पर्जन्यराजा, तीही अशीच व्याकुळ होते का रे तुझ्या आगमनाने?…कधी भेटली होती का तुला अशी डोळे टिपताना? तुला पाहून रडताना?
©डॉ.अशोक माळी,
साईनंदन पार्क, मिरज.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111




