👁 8 Views

गोशाळा हिंदु जनजागृती समितीला सांभाळण्यास द्या !

बाबासाहेब बडवे, माजी शहराध्यक्ष, भाजप, पंढरपूर
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या गोशाळेतील गायींच्या मृत्यूस उत्तरदायी असणार्‍या सर्वांवर कठोर कारवाई करा !
पंढरपूरात हिंदू जनजागृती समिती आक्रमक, आंदोलनाद्वारे केली मागणी !
आंदोलनात वारकरी संप्रदायसह ७५ हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फुर्त सहभाग

पंढरपूर (जिल्हा सोलापूर), १४ मे (वार्ता.) ‘‘गोशाळा तुम्हाला सांभाळता येत नाही, त्यामुळे तुम्ही हिंदु जनजागृती समितीला सांभाळण्यास द्या’’, असा घणाघात भाजपचे माजी शहराध्यक्ष बाबासाहेब बडवे यांनी केला. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या गोशाळेतील गायींच्या मृत्यूस उत्तरदायी असणार्‍या सर्वांवर कठोर कारवाई करा, या मागणीसाठी शनिवार, १३ मे या दिवशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदु जनजागृती समितीच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. या वेळी बाबासाहेब बडवे बोलत होते. या आंदोलनात वारकरी संप्रदायसह ७५ हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फुर्त सहभाग लाभला.
या वेळी वारकरी संप्रदाय पाईक संघाचे राष्ट्रीय प्रवक्ता ह.भ.प. रामकृष्ण महाराज वीर म्हणाले, ‘‘दायीत्वशुन्यपणे वागणार्‍या येथील मंदिर समितीच्या उत्तरदायी अधिकार्‍यांना कठोर शासन व्हायला हवे.’’ हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक मनोज खाडये म्हणाले, ‘‘यांना गोशाळा सांभाळण्याची पात्रता तर नाहीच; पण हिंदूंची मंदिरेही सांभाळण्याची क्षमता नाही.’’ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान विभाग प्रमुख प्रतापसिंह साळुंखे म्हणाले, ‘‘मंदिर समितीच्या गायी जेव्हा उकिरड्यावर चरत असतात, तेव्हा त्याचा जाब नगरपालिकेऐवजी मंदिर समितीच्या व्यवस्थापकांनाच विचारायला हवा. रायगडावर ३ आणि ४ जून या दिवशी ‘बत्तीस मणांचे सिंहासन’ उभारण्याचा कार्यक्रम होणार आहे, त्या वेळी पू. संभाजीराव भिडे गुरुजींना हा गंभीर प्रकार सांगून श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने हा विषय धसास लावला जाईल.’’ या वेळी अन्य मान्यवर सर्वश्री ह.भ.प. बाबुराव महाराज वाघ, सनातन संस्थेच्या सौ. अनिता बुणगे, भाजपचे विजय बडवे यांनीही आपले परखड विचार मांडले.
आंदोलनाचा प्रारंभ वारकरी संप्रदाय संघटक ह.भ.प. बाबूराव महाराज वाघ यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून करण्यात आला. ‘जनम जनम का नाता है, गोमाता हमारी माता है’, ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’, ‘हिंदु जनजागृती समितीचा विजय असो’ या घोषणांनी पंढरपूरकरांचे लक्ष वेधले. या वेळी आंदोलनातील सहभागी हिंदुत्वनिष्ठांनी विविध मागण्यांचे फलक हाती धरले होते. हे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. आंदोलनाचे सूत्रसंचालन सनातन संस्थेचे डॉ. श्रीपाद पेठकर यांनी केले.

आंदोलनात उपस्थित अन्य मान्यवर
ह.भ.प. अनिल महाराज बडवे, भाजपचे माजी शहराध्यक्ष बाबासाहेब बडवे, पंढरपूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा सौ. सुजाता बडवे, हिंदु महासभेचे शहराध्यक्ष बाळासाहेब डिंगरे, विवेक बेणारे, महेश खिस्ते, ओंकार घोडके, श्याम हिप्परकर, शिवसेना शहर प्रमुख वैभव बडवे, परशुराम युवा मंचचे श्रीराम बडवे, पेशवा युवा मंचचे सचिव गणेश लंके, घोंगडी ग्रामोद्योग व्यापारी प्रमोद सादिगले, सामाजिक कार्यकर्ते अनिल सप्ताळ, रोहन सुर्यवंशी, पुरोहित संघाचे विद्याधर वांगीकर, बजरंग दलाचे शहरप्रमुख सुनील बाबर, विश्‍व हिंदु परिषदेचे रामेश्‍वर कोरे, मंगळवेढा येथील माजी उपनगराध्यक्ष सुरेश जोशी, हिंदु जनजागृती समितीचे सोलापूर जिल्हा समन्वयक राजन बुणगे, शशीशेखर पाटील, सनातन संस्थेचे हिरालाल तिवारी, आप्पासाहेब बडवे, प्रतिष्ठीत व्यापारी अरूण बट्टेवार यांसह पुष्कळ संख्येने अन्य हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.
या आंदोलनाच्या माध्यमातून विविध मागण्या करण्यात आल्या –
१. गोशाळेतील गायींचे मृत्यू आणि त्यांची होणारी हेळसांड यांसाठी उत्तरदायी असणार्‍या सर्वांवर कठोर कारवाई करण्यात यावी
२. गोशाळेकडे अक्षम्य दुर्लक्ष करणार्‍या व्यवस्थापकांना हटवून गोशाळेचे व्यवस्थापन पारदर्शी आणि गोमातेची सेवा चांगल्या प्रकारे करू शकतील, अशा गोभक्त भाविकांकडे द्या.
३. यापुढे गोशाळेतील गायींची हेळसांड होणार नाही, यासाठी विविध उपाययोजना कराव्यात, त्या सर्व योजना भाविकांना समजण्यासाठी गोशाळेच्या बाहेरील दर्शनीय भागात जाहीर फलकावर लावाव्यात
प्रशासनाला देण्यात येणार्‍या निवेदनात म्हटले आहे की,
१. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व्यवस्थापन समिती महाराष्ट्र राज्याच्या अखत्यारित आहे. या मंदिर समितीच्या माध्यमातून गोशाळाही चालविली जाते. कोणत्याही गोशाळेचा उद्देश गोपालन आणि गोसंवर्धन व्हावे, हा असतो. हिंदु धर्मिय गायीला गोमाता मानतात, त्यामुळे गोसेवा करणे, हाही गोशाळा उभारण्याचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. मात्र या मंदिर समितीच्या गोशाळेबाबत असे घडतांना दिसत नाही.
२. आत्तापर्यंत या गोशाळेमध्ये अनेकदा नियमबाह्य कृती करणे, गायींची हेळसांड करणे यांसारख्या अनेक घटना घडत आहेत. हिंदु धर्मशास्त्रामध्ये गोदान करणे, तसेच गोमातेची सेवा करणे या कृतींना अतिशय महत्व असल्याने मंदिराच्या गोशाळेला गायी, तसेच त्यांच्या संगोपनासाठी देणगी मिळते, तसेच मंदिर समिती गोशाळेसाठी वेगळे अर्पणही गोळा करते; मात्र त्याचा वापर योग्यप्रकारे होत नसल्याने गोशाळेच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जात आहे.
३. मंदिर समितीच्या दुर्लक्षामुळे गोशाळेतील अनेक गायींचा मृत्यू ओढवला आहे. या गोशाळेतील गायींना योग्य प्रकारचा चारा मिळावा, यासाठी मंदिर समितीने विविध ठेके दिले आहेत. असे असतांना अनेकदा गायींना चारा मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. चार्‍याअभावी गावातील उकीरड्यावरील कचरा खाल्ल्याने गायींच्या पोटात प्लास्टिकच्या पिशव्या आणि अन्य घातक पदार्थ मोठ्या प्रमाणात गेल्याने काही गायींचा मृत्यू झाल्याचे गंभीर प्रकार घडले आहेत.
४. माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार मृत्यू झालेल्या गायींच्या पोटात १४ ते १५ किलो प्लास्टिक, तसेच
लोखंडी तारेचे गोळे मिळाले, अशी माहिती प्राप्त झाली आहे. गोपालनासाठी पुरेसे अर्पण भाविकांनी करूनही गायींना योग्य खाद्य उपलब्ध न झाल्यामुळे त्या मृत्यूमुखी पडतात, हे अक्षम्य आहे. गोपालनाच्या दृष्टीने त्यांना पुरेसा चारा उपलब्ध करून देता न येणे, हा मंदिर समितीच्या गलथान आणि भ्रष्टाचारी कारभाराचा नमुना आहे. देवनिधीमध्ये होणारा असा अपहार हे एक महापापच आहे.
छायाचित्र ओळ
5. पंढरपूरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या गोशाळेतील गायींच्या मृत्यूस उत्तरदायी असणार्‍या सर्वांवर कठोर करा, या मागणीसाठी आंदोलन करतांना हिंदुत्वनिष्ठ समिती

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *