नागरिकांचा सवाल ः महामार्गालगत बंदीनंतर चाकण एमआयडीसीत विक्री वाढली
भामा आसखेड, दि. 18 (वार्ताहर) -सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय व राज्य महामार्गावर 500 मीटरच्या आत असलेली देशी, विदेशी दारू विक्रीची दुकाने व हॉटेल बंद करण्याचे आदेशाची अंमलबजावणी 1 एप्रिल पासून सुरु झाली, मात्र आजही पोलिसांच्या आशीर्वादाने बहुतांश भागात छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात चाकणच्या औद्योगिक भागातील छोट्या मोठ्या हॉटेलमधून देशी, विदेशी व हातभट्टी दारू विक्री सुरू आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला एक प्रकारे वाटण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत.
1 एप्रिल 2017 पासून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सर्वच राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून 500 मीटर अंतराच्या व 20 हजार किंवा त्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या भागात मात्र, ही मर्यादा 500 मीटर ऐवजी 220 मीटर अंतराची केली आहे. त्यामुळे वरील नियमानुसार सर्वच मद्यविक्रीच्या आस्थापनांना टाळे लावण्याशिवाय पर्याय उरला नाही, न्यायालयाची अंमलबजावणी सुरू होऊन परवानाधारक दारूची दुकाने व हॉटेल बंद झाली, मात्र छुप्या मार्गाने काही राजकीय लोकांच्या आशीर्वादाने तर काही ठिकाणी पोलिसांच्या हप्तेखोरीने मोठ्या प्रमाणात दारु विक्रीचा सुळसुळाट सुरू आहे. एमआयडीसीच्या टप्पा क्रमांक दोनमधील आंबेठाण, वराळे, सावरदरी, वासुली फाटा या भागातील अनेक हॉटेलमध्ये छुप्या मार्गने पोलिसांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात दारूविक्री सुरू आहे, दारूबंदीमुळे सरकारचा कोट्यवधी रुपये महसूल बुडाला; परंतु पोलिसांच्या हप्तेखोरीत मोठी वाढ झाली आहे.
औद्योगिक वसाहतीमुळे चाकण व परिसरातील नागरिकीकरण मोठ्या प्रमाणावर वाढल्याने अवैध धंदेही त्याच पटीत वाढले आहेत. पोलिसांकडून नेहमीच असल्या अवैध धंद्यावर कारवाई होत असते, मात्र ही कारवाई केवळ फार्स ठरत असल्याचे अनेकदा समोर आले आहे, मागील काही दिवसांपूर्वी हात भट्टी च्या दारू तयार करणाऱ्या भट्टी वर छापा मारून मोठ्या प्रमाणात दारू बनवण्याचे रसायन व साहित्य नष्ट करण्याची कारवाई करण्यात आली होती, परंतु करण्यात आलेली कारवाई ने हात भट्टी दारू विक्रीमध्ये काहीही फरक पडलेला दिसून येत नाही.
500 मीटर काय हजार मीटर काय, 5 किलोमीटरवर जरी दारू विक्री सुरू केली तरीही दारू पिणारे तेथेही जातील, यात शंका नाही. मग दारू पिणाऱ्यासाठी दारू विक्री कुठेही सुरू ठेवली तरी तो तिथे जाऊन दारू खरेदी करून पिऊ शकतो. महामार्गापासून 500 मीटर दूर दारूची दुकाने किंवा छुप्या मार्गाने दारू हवी तिथे मिळत असल्याने म्हणावा तेवढे दारू बंदचा असर झालेला दिसून येत नाही. चाकण शहरात मोठ्या प्रमाणावर महामार्गावरील धाब्यावर सर्रास दारू मिळत आहे. ही दारू विक्री एक तर राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने किंवा पोलिसांच्या हप्तेखोरीमुळे सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
हप्त्यात वाढ झाल्याने दारुही महागली
महामार्गावरील दारूविक्री बंद झाली असली तरी, तळीरामांना काहीही फरक पडलेला दिसत नाही. कारण महामार्गापासून 500 मीटरच्या पुढे असलेली दारूची दुकाने चालू आहेत, या काही परवाना धारकांकडून जादा दराने दारू विक्री सुरू आहे. तसेच काही ढाबे चालकांनाही चढ्या दराने छुप्या मार्गाने दारू विक्री सुरू केली आहे. काही ढाबेचालकांनी नाव न छापण्याचया अटीवर सांगितले की, पोलिसांच्या हप्त्यांत वाढ झाल्याने चढ्या दराने दारुविक्री करावी लागत आहे. हातभट्टी दारूचेही भाव वाढल्याचे समोर आले आहे. 10 रुपयांना एक ग्लास पूर्वी मिळत होता, आता 20 रुपयांना एक ग्लास दारू मिळत आहे. तर 35 लिटरचे कॅन दोन हजार रुपयांना मिळत आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





