जिल्हाधिकारी कार्यालयाने तयार केले “पालखी सोहळा 2017 ऍप’
– 12 जूनपासून ‘प्ले स्टोअर’ उपलब्ध असेल मोबाइल ऍप
पुणे, (प्रतिनिधी) –
आषाढी वारीमध्ये विठ्ठल-रखुमाईचा गजर करता पंढपूरकडे वारकरी मार्गस्थ होतात. या काळात लाडक्या विठ्ठल-रखुमाईचे ‘लाइव दर्शन’ घेता यावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने “पालखी सोहळा-2017′ मोबाइल ऍप विकसित केले आहे. या माध्यमातून वारकरी कधीही विठ्ठल-रखुमाईचे ‘लाइव दर्शन’ घेऊ शकणार आहेत. सोबतच या ऍपवर वारकऱ्यांना वारीच मार्ग, विसावा आणि मुक्कामेच ठिकाण, वैद्यकीय सुविधा, व्यवस्थापन आणि सूचनांची माहिती मिळणार आहे.
पंढरपूर आषाढी वारीसाठी तब्बल दहा लाख वारकरी येतात. त्यांच्या सुविधेसाठी जिल्हा प्रशासन दरवर्षी माहिती पुस्तिका छापते. यामध्ये वारीशी संबधित सर्व माहिती असते. या वर्षी माहिती पुस्तकासह मोबाइल ऍपची सुविधा जिल्हा प्रशासनाने उपलब्ध केली आहे. 16 जून ते 9 जुलैदरम्यान पार पडणाऱ्या आषाढी वारीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून “पालखी सोहळा’ मोबाइल ऍप विकसित करण्यात आले आहे. या ऍपद्वारे कोणताही व्यक्ती तक्रार, सूचना आणि मदत मागू शकतो. पाणी टॅंकर, आरोग्य सेवा, धान्य, रॉकेल, सिलिंडर पुरवठा सुविधा दिली जाणार आहे. तसेच श्री विठ्ठल आणि श्री रखुमाई यांच्या पंढरपूर मंदिर गाभाऱ्यातील मूर्तींचे चोवीस तास “लाइव्ह’ दर्शनाची सुविधा यामध्ये उपलब्ध आहे. हरविलेल्या व्यक्तींचा शोध देखील यावर घेता येणार आहे. याप्रमाणे देहू, आळंदी, पंढरपूर देवस्थान विश्वस्त, पालखी सोहळा प्रमुख, दिंडी प्रमुख, जिल्हाधिकारी, सर्व तहसीलदार, आरोग्य केंद्रे, नियंत्रण कक्ष इत्यादींचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. येत्या 12 जूनपासून “प्ले स्टोअर’ वरून हे “मोबाइल ऍप डाऊनलोड’ करता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी यावेळी दिली.
1091 आणि 100 हेल्पलाइन सहा महिन्यांपासून बंद
ग्रामीण पोलिसांच्या कंट्रोल रूमला संपर्क करण्यासाठी 100 क्रमांक डायल करावा लागतो. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून बीएसएनलची सेवा विस्कळीत असल्याने लॅंडलाइनवरून हा क्रमांक लागत नाही. तसेच 1091 ही महिलांच्या मदतीच्या हेल्पलाईनची सेवा विस्कळीत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी 100 क्रमांक डायल केल्यानंतर, फोन पुणे शहर कंट्रोल रूमला कनेक्ट होतो. ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक असणाऱ्या या सेवा बंद आहेत. याबाबत बीएसएनएलशी चर्चा केली. मात्र, अद्याप बीएसएनएलने काहीच उपाययोजना केली नसल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी बैठकीमध्ये दिली.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





