👁 12 Views

सबझार बटच्या दफनविधीत घोषणा देणारा दहशतवादी पोलिसांना शरण

२०१६ मध्ये हंदवाडामधील दगडफेकीच्या घटनेत दानिशचा सहभाग

सबझार बटच्या दफनविधी दरम्यान घोषणा देणारा दानिश अहमद

हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर सबझार बटच्या दफन विधीदरम्यान घोषणाबाजी करणारा दहशतवादी पोलिसांना शरण आला आहे. दानिश अहमद असे या दहशतवाद्याचे नाव असून २०१६ मध्ये हंदवाडामधील दगडफेकीच्या घटनेतही त्याचा सहभाग होता.
जम्मू काश्मीरमधील हंदवाडा जिल्ह्यातील रहिवासी फारुख अहमद यांचा मुलगा दानिश अहमद हा दहशतवादी संघटनेत भरती झाला झाला होता. सोशल मीडियावर हातात ग्रॅनेड, बंदूक आणि बॅटल पाऊच घातलेल्या दानिशचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल केले जात होते. हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानीनंतर संघटनेच्या प्रमुखपदाची जबाबदारी घेणाऱ्या सबझार अहमद बटच्या दफनविधीत दानिश घोषणाबाजी करतानाचे छायाचित्रही प्रसिद्ध झाले होते. दहशतवाद्याच्या वेशातील दानिशचा फोटो व्हायरल झाला होता.
दानिशने पोलिसांना शरण यावे यासाठी पोलिसांच्या पथकाने त्याच्या पालकांशी संपर्क साधला होता. पोलिसांच्या या प्रयत्नांना यश आले असून दानिश पोलिसांना शरण आला आहे. दानिश हा बीएससीच्या तृतीय वर्षात असताना २०१६ मध्ये हंदवाडा येथील दगडफेकीच्या घटनांमध्ये त्याचा सहभाग होता. पोलिसांनी त्याला यापूर्वीही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र समुपदेशनानंतर त्याला सोडून देण्यात आले होते.
काही दिवसांपूर्वी पोलिसांनी दानिशच्या कुटुंबाशी संपर्क साधला होता. ‘दानिश शरण आल्यास कायद्यानुसारच त्याच्यावर कारवाई होईल असे आश्वासन आम्ही त्याच्या पालकांना दिले होते. या प्रयत्नांना यश आले आणि तो हंदवाडा पोलिसांसमोर शरण आला’ असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. दानिशविरोधात आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमध्ये शरण येणाऱ्या दहशतवाद्यांसाठी वेगळे धोरण असून याअंतर्गत त्याच्यावर पुढील कारवाई होईल असे पोलिसांनी म्हटले आहे. सोशल मीडिया आणि वेबसाईट्द्वारे दानिश दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला होता. संघटनेत भरती झालेल्या अनेक तरुणांना शरण यायचे आहे. पण भीतीपोटी ते शरण येत नाही. शरण आल्यावर आपला जीव धोक्यात असल्याचे  त्यांना वाटते असे दानिशने पोलिसांना सांगितले. उत्तर काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्याचे काम माझ्याकडे सोपवण्यात आले होते असे दानिशने म्हटले आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *