सेनगाव(हिंगोली), दि. 10- ‘गण गण गणात बोते’च्या गजरात संत श्री गजानन महाराज पालखीचे १० जूनला शनिवारी सकाळी सात वाजता सेनगाव तालुक्यातील पानकनेर गावमार्गे मराठवाड्यात आगमन झाले. सीमेवर भाविकांनी या पालखीचे हर्षोल्हासात स्वागत केले.
विदर्भातील पंढरी म्हणून परिचित असलेल्या श्रीक्षेत्र शेगाव येथील श्री. संत गजानन महाराज पालखीचा पायदळ सोहळा आषाढी एकादशीकरिता दरवर्षी यामार्गे जातो. यावर्षी पालखीचे ५० वे वर्षे आहे. शनिवारी सकाळी सात वाजता पालखीचे मराठवाड्यात तालुक्यातील पानकनेरगावमार्गे आगमन झाले.
या वेळी मराठवाड्याच्या सीमेवर पालखीचे आनंदी वातावरणात मोठ्या श्रद्धेने स्वागत करण्यात आले. सीमेवर ‘श्रीं’च्या पालखीचे स्वागत करण्यासाठी पानकनेरगाव, खैरखेडा, वाढोणा आदी परिसरातील भाविकांची मोठी उपस्थित होती. यावेळी ‘श्रीं’ची पूजा करुन आ. तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते पालखीचे स्वागत करण्यात आले.
यावेळी बाजार समिती सभापती शंकर बोरुडे, गिरधारी तोष्णीवाल, पोलीस निरीक्षक मधुकर कारेगावकर, सेनेचे तालुकाप्रमुख संतोष देवकर आदी उपस्थित होते. पालखीत ६५० वारक-यांचा सहभाग आहे.
पालखीचे दुपारी १२ वाजता पानकनेरगाव येथे आगमन झाले. या ठिकाणी ग्रामस्थांनी स्वागताची जंगी तयारी केली होती. पूर्ण गावच धार्मिक वातावरणाने भारले होते. दुपारच्या जेवनानंतर पालखी सेनगावकडे मार्गस्थ झाली. सायंकाळी सहा वाजता सेनगाव शहरात पालखी सोहळा दाखल झाला. शहरात ‘श्रीं’चे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.
विशेषत: महिला भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. येथील जि. प. प्रशालेत पालखी सोहळा दाखल झाल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. रात्री पालखी शहरात मुक्कामी आहे. रविवारी सकाळी पालखी नरसीमार्गे पुढे रवाना होणार आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




