दोघींनी परस्परांच्या भेटीत अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
आत्महत्याग्रस्त पित्याची अडीच वर्षांची मुलगी दत्तक म्हणून स्वीडनला गेली आणि वयाच्या १३ व्या वर्षांनंतर आपले खरे जन्मदाते आईवडील कोण याचा शोध घेत राहिली. अखेर तिला २७ वर्षांनंतर मृत्यूच्या दाराकडे जात असलेली आई गवसली. आईची आणि मुलीची भेट शुक्रवारी यवतमाळात वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाली. दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या आईला आपली मुलगी स्वीडनहून आल्याचे समजले. या दोघींनी परस्परांच्या भेटीत अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
नीलाक्षी एलीझाबेथ
मानवी जीवनात अशक्य वाटणाऱ्या या घटनेची साद्यंत कथा लोकजागृती मंचाचे अध्यक्ष देवानंद पवार यांनी स्वीडनहून आलेल्या या मुलीच्या उपस्थितीत पुण्याच्या सामाजिक कार्यकर्त्यां ‘अगेन्स्ट चाईल्ड ट्राफीकींग’ संघटनेच्या अॅड. अंजली पवार आणि जर्मनीत वास्तव्यास असलेले अरुण डोल यांच्याकडून येथे वार्ताहर परिषदेत कथन केली. अॅड. अजंली पवार यांनी सांगितले, यवतमाळ जिल्ह्य़ातील वरूड येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून विष घेऊन १९७३ मध्ये आत्महत्या केली होती. त्यांची पत्नी माहेरी गेली तेव्हा ती गरोदर होती तिने एका मुलीला जन्म दिला. ती मुलगी पुण्याच्या एका संस्थेत देण्यात आली. त्या संस्थेने तिला स्वीडनच्या एका दांपत्याला दत्तक दिले. दरम्यान, या मुलीच्या आईने दुसरा विवाह केला. तिला दोन मुले, एक मुलगी झाली. तिच्या दुसऱ्या पतीचे निधन झाले. मोलमजुरी करून तिची उपजीविका सुरू असताना ती आजारी होऊन मृत्यूच्या दारात उभी असताना सामाजिक कार्यकर्त्यांनी अपार कष्ट घेत वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करून जीवदान दिले. तिकडे स्वीडनमध्ये असलेल्या तिच्या नीलाक्षी एलीझाबेथ या मुलीला अरुण डोल आणि अॅड. अंजली पवार व अमरावतीच्या नाना लोंढे यांच्या अथक प्रयत्नाने आईचा शोध लागला. हे सारेजण शुक्रवारी यवतमाळला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पोहोचले. नीलाक्षी एलीझाबेथ आणि तिच्या आईची गळाभेट झाली आणि दोघी हमसुहमसु रडल्या. नीलाक्षीदेखील आजारी असल्याने तिने स्वीडनमधील नोकरी सोडली आहे. स्वीडन सरकार तिच्या आरोग्याची काळजी घेत आहे. लवकरच ती स्वीडनमध्ये परत जाणार आहे. आई आणि मुलीची डीएनए चाचणीदेखील झाली आहे. स्वीडनमध्ये असताना आपल्या काळया वर्णभेदावरून आपण स्वीडीश नाही याची पक्की जाणीव झाल्यानंतर नीलाक्षीने जन्मदात्या मातापित्याचा शाध सुरू केला होता. न्यायालयानेसुध्दा अरुण डोल यांनी स्वतच्याच एका प्रकरणात दाखल केलेल्या याचिकेत निकाल देताना अशा अनाथ किंवा दत्तक मुलांना आपले आई वडील शोधण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे. अशा मुलांच्या हक्कासाठी अरुण डोल आणि अॅड. अजंली पवार लढा देत आहेत. त्यांच्या लढय़ात त्यांना नीलाक्षी एलीझाबेथ आणि तिच्या आईची भेट घडवून देता आली याचे समाधान असल्याचे अॅड. अजंली यांनी वार्ताहरांना सांगितले. देशातील दत्तक कायद्यात अनेक सुधारणांची गरज त्यांनी प्रतिपादन केली. डॉ. चेतन दरणे, डॉ. बिपीन चौधरी, डॉ. योगेश धानोरकर, डॉ. कैलास भोयर या कार्यकत्यार्ंनी नीलक्षीच्या आईला आजारपणातून बाहेर काढण्यात मेहनत घेतली. त्यांचा व अरुण डोल आणि अजंली पवारसह नीलाक्षी एलीझाबेथचाही सत्कार लाकजागृती मंचाने केला.
असाही योगायोग
यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून जगभर वेगळया अर्थाने प्रसिध्द आहे. नीलाक्षी एलीझाबेथच्या शेतकरी वडिलांनी देखील विष घेऊन आत्महत्या केली होती. ते सुध्दा यवतमाळ जिल्ह्य़ातीलच होते. हा सारा योगायोग असून स्वीडनची मुलगी भारतात आईला शोधत येते आणि आज सरकार शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकायला तयार नाही. हाही एक योगायोगच म्हणावा काय? असा सवाल देवानंद पवार यांनी वार्ताहर परिषदेत विचारून सर्वाना सुन्न केले.
वसंतही बहरला होता..
नीलाक्षी एलीझाबेथ सारखाच किस्सा १९९४ मध्ये यवतमाळात घडला होता. महाराष्ट्र राज्य विश्राम भवन खानसामा संघटनेचे अध्यक्ष वसंत घोडमारे यांचा मोठा भाऊ दहा वषार्ंचा असतांना घरून निघून गेला होता. तब्बल ३० वर्षांनंतर त्याची आणि वसंताची भेट मुंबईत एका टॅक्सीत झाली होती. मोठा भाऊ टॅक्सी चालक होता. गप्पांच्या ओघात सारा उलघडा झाला. भावाच्या हातावर गोंदलेले पूर्ण नाव पाहून दोघांच्याही आनंदाला पारवार उरला नव्हता. वसंताने भावाला काही दिवसासाठी यवतमाळात आणले होते. या घटनेचे खास वृत्त तेव्हा लोकसत्ताच्या पहिल्या पानावर प्रसिध्द झाले होते, हे उल्लेखनीय

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




