👁 10 Views

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेचा आरोग्यमंत्र्यांनी घेतला आढावा

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेचा 
आरोग्यमंत्र्यांनी घेतला आढावा

पंढरपूर शहरात दुचाकीवरील आरोग्यदूत सहाय्य करणार

मुंबई, दि. 20 : पंढरपूर येथे आषाढी एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर वारकरी व भाविकांना पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेबाबत आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज आढावा घेतला. आपत्कालीन वैद्यकीय सेवेतील रुग्णवाहिकेच्या सेवा, आरोग्य संस्थांचे बळकटीकरण, पालखी मार्गावरील जलस्त्रोतांचे शुध्दीकरण याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. वारी काळात पंढरपूर शहरात आरोग्यदूत ही संकल्पना राबविण्यात येणार असून 30 दुचाकींच्या सहाय्याने आरोग्यदूत भाविक तसेच वारकऱ्यांना आरोग्य सेवेबाबत सहाय्य करतील, असे आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
मंत्रालयात झालेल्या बैठकीस सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख, आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार, सहसंचालक डॉ. बी.डी. पवार आदी यावेळी उपस्थित होते.
दिनांक 30 जून ते 9 जुलै या दहा दिवसांच्या काळात पंढरपूर शहरात आषाढी एकादशीनिमित्त येणाऱ्या भाविकांना त्रिस्तरीय पध्दतीने आरोग्य सेवा पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय व विठ्ठल रुक्मीणी मंदिर परिसरात येथे अतिदक्षता कक्ष सुरु करण्यात आले आहे. त्याचबरोबर पंढरपूर शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये दहा टक्के खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे 100 खाटांचे आरोग्य उपकेंद्र येथे कार्यरत आहे. त्याचबरोबर 50 खाटांचे संसर्गजन्य रुग्णालय देखील कार्यरत आहे. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील 18 धर्मादाय रुग्णालयाच्या माध्यमातून पंढरपूर येथे वारी काळात 24 तास आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे. 
वारी काळात संपूर्ण पालखी मार्गावर आपत्कालीन वैद्यकीय सेवेतील (क्रमांक 108) 75 रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर दोन मुख्य पालखींसोबत 108 व 102 क्रमांक सेवेतील 12 रुग्णवाहिका देखील ठेवण्यात आल्या आहेत. 
वारी काळामध्ये पंढरपूर शहरात आरोग्यदूत ही संकल्पना राबविण्यात येणार असून 30 दुचाकींच्या सहाय्याने आरोग्यदूत भाविकांना आरोग्य सुविधेबाबत सहाय्य करतील. हे आरोग्यदूत शहरातील पाणी शुध्दीकरण तपासणीबरोबरच आरोग्य केंद्रांची माहिती देखील नागरिकांना देतील. त्याचबरोबर रुग्णवाहिका कोणत्या ठिकाणी आहे याचे मार्गदर्शन करण्याबरोबरच गरज भासल्यास दुचाकीवरुन रुग्णाला जवळच्या दवाखान्यात देखील उपचारासाठी नेण्यात येईल. फक्त पंढरपूर शहरातच 102 व 104 क्रमांक सेवेतील 14 रुग्णवाहिका ठिकठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. या रुग्णवाहिका प्रसंगी बाह्य उपचार केंद्र म्हणून देखील या काळात कार्यरत राहतील. पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात संपर्क कक्ष (02186-225101/225103) सुरु करण्यात येणार आहे. याबरोबरच शहरात आठ ठिकाणी प्रथमोपचार केंद्र सुरु करण्यात येणार आहे. 
वारीच्या काळात 108 क्रमांकाच्या सेवेतील आपत्कालीन रुग्णवाहिकेचे नियंत्रण कक्ष पंढरपूर येथे कार्यान्वित करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे नियंत्रण कक्षात आलेल्या कॉलला स्थानिक ठिकाणांवर अचूक पध्दतीने रुग्णवाहिका पाठविणे सुलभ होणार आहे. पंढरपूर शहरात येणाऱ्या पालखी मार्गावरील आरोग्य संस्थांमधील सर्व प्रकारच्या सेवा पुरविण्यासाठी त्यांचे बळकटीकरण करण्यात आले आहे. 
पालखी मार्गावरील सर्व जलस्त्रोतांची तपासणी करुन त्याचे क्लोरीनेशन करण्यात आले आहे. टँकरमध्ये पिण्याचे पाणी भरण्यासाठी जागा निश्चित करण्यात आल्या असून त्या ठिकाणी आरोग्य विभागाचे कर्मचारी कार्यरत आहेत. ज्या ठिकाणी पालखी मुक्कामाला असते त्याच्या दोन दिवस आधी त्या भागात डास प्रतिबंधक फवारणी केली जाते. वारी काळात भाविकांना दर्जेदार आणि तत्पर सेवा देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी यावेळी सांगितले.
बैठकीस आरोग्य विभागाचे पुणे विभागीय उपसंचालक डॉ. संजय देशमुख, सोलापूर येथील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम. आर. पट्टणशेट्टी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *