👁 11 Views

जाता जाता दिले तिघांना जीवदान

– नागपुरात महाअवयवदान
नागपूर, २४ जून
घरातील एखादा माणूस अचानकपणे निघून गेला तर साहजिकच घरातील प्रत्येकाला असह्य असे दु:ख होते. मात्र, त्या दु:खावर मात करून समाजाचा विचार करणारे फार कमी लोक असतात. समाजाप्रती अशीच कर्तव्य भावना देशकर कुटुंबीयांनी दाखवली. आपल्या घरातील व्यक्तीच्या मृत्यूचे दु:ख पचवत त्यांनी समाजातील तीन गरजू रुग्णांना जीवदान दिले.
विनायक देशकर (६७) असे मेंदू मृत रुग्णाचे नाव आहे. आपल्या कुटुंबासोबत सुटीवर गेलेल्या विनायक देशकर यांना ब्रेन हॅमरेज झाल्याने तातडीने नागपूरच्या ट्रिनिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या मेंदूत रक्ताच्या गाठी तयार झाल्याने त्यांच्या शरीराचा उजवा भाग निकामी झाला. मेंदूत रक्तस्राव झाल्याने मेंदूने काम करणे बंद केले. मात्र, त्यांचा श्‍वासोच्छवास सुरू असल्याने डॉ. प्रमोद गिरी आणि डॉ. संग्राम वाघ यांनी त्यांना मेकॅनिकल व्हेन्टिलेटरवर ठेवण्याचा निर्णय घेतला. डॉ. शैलेश पितळे, डॉ. संजीव बैस, डॉ. सुशांत चरडे, डॉ. संग्राम वाघ आणि त्यांच्या चमूतर्फे उपचार करण्यात येत होते. देशकर यांची संपूर्ण चाचणी केल्यानंतर त्यांना ऑरेंज सिटी हॉस्पिटल ऍण्ड रीसर्च सेंटर येथे हलविण्यात आले. येथे आल्यानंतर डॉ. देवयानी बुचे, डॉ. आर. अटल, डॉ. वसंत डांगरे, डॉ. निनाद गायकवाड आणि नुरल आमीन यांनी त्यांना मेंदू मृत घोषित केले.
रुग्णाचा मेंदू मृत झाल्याचे लक्षात येताच त्यांची पत्नी गायत्री व मुले अभिषेक आणि अनुराग यांनी डॉक्टरांकडे अवयवदान करण्याची इच्छा वर्तविली. अवयव काढण्यासाठी आणि प्रत्यारोपणासाठी लगेच डॉ. अनुप मरार यांनी रुग्णाच्या नातेवाईकांचे समुपदेशन केले. त्यानंतर डॉ. वानखेडे यांच्यामार्फत रिजनल ऑर्गन ऍण्ड टिशू ट्रान्सप्लांटेशन ऑर्गनायझेशन आणि नॅशनल ऑर्गन ऍण्ड टिशू ट्रान्सप्लांटेशन ऑर्गनायझेशनला अवयवाची गरज असणार्‍या रुग्णांची माहिती पाठविण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या. दोन्ही संस्थांतर्फे माहिती येताच लिव्हर, किडनी आणि फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी रवाना करण्यात आले. रुग्णाची त्वचा ओचरीच्या स्कीन बँकमध्ये तर डोळे महात्मे आय बँकेला दान करण्यात आले. संपूर्ण विभागातील हे १९ वे महाअवयवदान ठरले. विनायक देशकर यांच्या कुटुंबीयांनी घेतलेला हा निर्णय अतिशय धाडसाचा होता. त्यांच्या या तत्परतेमुळे तीन गरजूंना जीवदान मिळाले. अवयवदानासाठी डॉ. आशिष शुक्ला, डॉ. गणेश बुरे, डॉ. राणी लाखे, डॉ. रोशन जावळेकर, डॉ. संतोष गाडगे, डॉ. सौरव राठी, डॉ. वसुंधरा जैन, नेहा अग्रवाल, डॉ. संदीप देशमुख, डॉ. समीर जहागीरदार, डॉ. स्मिता हरकरे, डॉ. अनिल पांडे, डॉ. स्विटी पसारी, अंबिका नायर यांनी परिश्रम घेतले. मंजिरी दामले, सुनील सुरे, प्रिया शशी, गणेश अय्यर यांनी प्रशासकीय कामात मदत केली. तर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त जयेश भंडारकर, सुधीर नंदनवार आणि रवींद्र परदेशी यांच्यासह १०० पोलिसांनी ग्रीन कॉरिडोअर तयार करून दिले.
लिव्हरचे मुंबईत प्रत्यारोपण
मुंबईच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये लिव्हर तर चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये फुफ्फुसाची गरज असणारा रुग्ण असल्याचे सांगण्यात आले. मात्र, चेन्नई येथील रुग्ण गंभीर असल्याने त्याठिकाणी फुफ्फुसाचे प्रत्यारोपण शक्य झाले नाही. परंतु, मुंबईच्या ग्लोबल हॉस्पिटलतर्फे डॉ. रवि मोहनका यांनी विशेष विमानाने मुंबईला लिव्हर नेले. लिव्हर वेळेत पोहोचावे म्हणून ऑरेंज सिटी ते विमानतळ असा ग्रीन कॉरिडोअर तयार करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई येथे त्याचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. तर नागपूरच्या केअर आणि वोक्हार्ट रुग्णालयातील दोन रुग्णांना किडनी देण्यात आली.
……….
अवयवदानाची आकडेवारी वर्ष अवयवदान
२०१३ १
२०१४ ३
२०१५ ५
२०१६ ६

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *