👁 10 Views

मुंबई काँग्रेस आता ‘भगव्या वाटे’वर; हिंदु मतदारांना लुभावण्‍यासाठी रोज चमत्‍कारिक मागण्‍या

मुंबई– उत्तर भारतीय मतदार मुंबई काँग्रेससाठी एकेकाळी हक्काची व्होट बँक होती. मागच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या ही पारंपरिक व्होट बँक भाजपने पळवली. त्यामुळे मुंबई काँग्रेसला मतांच्या ध्रुवीकरणासाठी आता नव्या समीकरणाची गरज आहे. त्यातूनच मुंबई काँग्रेसनेही आता भाजपप्रमाणे हिंदू मतदारांचा अनुनय करण्याचा प्रयत्न सुरू केला अाहे.
आपला पक्षदेखील हिंदूंचाच आहे, हे भासवण्यासाठी मुंबई काँग्रेसचे नेते रोज चमत्कारिक मागण्या अाणि घोषणा करत आहेत. मुंबई काँग्रेसमध्ये अनेक दशके गुरुदास कामत अाणि मुरली देवरा असे दोन मुख्य गट होते. उत्तर भारतीयांच्या एकगठ्ठा मतांकरवी काँग्रेस तिकीट देई तो येथे निवडून येई. परंतु मागच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर भारतीय मतदार भाजपमागे गेले. परिणामी मुंबईत काँग्रेस सध्या मरणासन्न अवस्थेत आहे.
विद्यमान अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुंबई काँग्रेसअंतर्गत नुकताच ‘संत-महंत’ सेल स्थापन केला आहे. मुंबईतील मंदिरांचे प्रश्न सोडवण्यासाठी हा सेल काम करणार आहे म्हणे. सेलच्या पहिल्या बैठकीत उपस्थित महंतांनी चक्क ‘अयोध्येत राम मंदिर उभारावे’ अशी मागणी केली. तेथे उपस्थित असलेल्या निरुपम यांनी त्यापुढे जात ‘आपणही कट्टर हिंदू अाहोत’ असे जाहीर केले.
दुसऱ्या दिवशी काँग्रेस प्रवक्ते डाॅ. राजू वाघमारे यांनी तशीच मागणी केली. वडाळा येथील मोनोरेल स्टेशनला ‘विठ्ठल मंदिर’ नाव देण्यासाठी त्यांनी एमएमआरडीए आयुक्तांना पत्र दिले. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांच्या मागणीवर काँग्रेसच्या नेत्यांना काहीही वावगे वाटत नाही. कामत गटाचे कट्टर असलेल्या नसीम खान यांनीच काय तो संजय निरुपम यांच्या धार्मिक सेलला विरोध दर्शवला.
काँग्रेसच्या या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यांवर ‘अाता काँग्रेससुद्धा…’ अशीच चर्चा मुंबईत आहे. निरुपम तसे हार्डकोअर काँग्रेसवासी नाहीत. बिहारी बाबू असून ते मूळचे पत्रकार आहेत. नंतर शिवसेनेचे खासदार झाले. २००५ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबई अध्यक्ष झाल्यापासून निरुपम यांना कामत गटाचा मोठा विरोध आहे. निरुपम यांना २०१५ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला. उत्तर मुंबई हा उत्तर भारतीयांमुळे काँग्रेसचा गड मानला जायचा. मात्र उत्तर भारतीय मतदारांनी या वेळी निरुपम यांना दूर सारले. उत्तर भारतीय असणेच पुरेसे नाही हे निरुपम यांना कळले आहे.


अल्पसंख्याक व्हाेट बँक दुरावण्याची शक्यता 
हिंदुत्वाशी जवळीक साधणारी वक्तव्ये करत निरुपम भाजपमध्ये जाण्याची पार्श्वभूमी करत आहेत, असे काँग्रेसचे काही नेते सांगतात. काही नेत्यांच्या मते, भाजपने धर्माच्या राजकारणाकरवी हिंदू व्हाेट बँक पळवली. भाजपला टक्कर द्यायची असेल तर निरुपम जी भाषा करत आहेत ती योग्यच आहे. एकूणच उत्तर भारतीय व्हाेट बँक दुरावल्याने मुंबई काँग्रेस सध्या सैरभैर आहे. त्या वैफल्यातून मुंबई काँग्रेसचा प्रवास आता भगव्याच्या वाटेने सुरू झाला आहे. मात्र या खेळात उत्तर भारतीयांप्रमाणे काँग्रेसला मुंबईतील दुसऱ्या मोठ्या म्हणजे अल्पसंख्याक व्होट बँकेला मुकावे लागण्याची शक्यता आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा


  













सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 

पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *