पहूर (जळगाव) : पहूर – जामनेर मार्गावरील सोनाळा शिव रस्त्यावर शिंगाईतच्या तरुणाची अज्ञात मारेकऱ्यांनी दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना मंगळवारी (२१ मार्च) दुपारी तीनच्या सुमारास घडली.
अज्ञात मारेकऱ्यांनी मद्यपान करून प्रमोद वाघ यांची हत्या करून घटनास्थळावरून पोबारा केला.
पहूर – जामनेर मार्गावर हॉटेल वृंदावननजीक सोनाळा -पहूर शिव रस्त्यावर सोनाळा येथील प्रफुल्ल भरत पाटील यांच्या कपाशीच्या शेतात लिंबाच्या झाडाखाली शिंगायत येथील प्रमोद उर्फ बाळू वाघ (वय ३७) याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. प्रमोद वाघ सकाळपासूनच घरून निघाला होता.
दुपारी जामनेरहून पहूर येथे जातो, असे शालक (रा. पाटखेडा) यास फोनवरून सांगितले. शेतकरी प्रफुल्ल पाटील हे सायंकाळी पाचच्या सुमारास शेताकडे गेले असता त्यांना निंबाच्या झाडाखाली दारूच्या बाटल्यांसह ३ ग्लास, पाणी बॉटल आणि अर्धवट खाल्लेला वडापाव आढळून आला. बाजूलाच रक्ताने माखलेला दगड पाहताच त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली.
मृतदेह फरफटत नेत शेतात टाकला
मारेकऱ्यांनी निर्दयपणे प्रमोदच्या डोक्यात दगड टाकल्याने झाडाखाली दगड आणि माती रक्ताने माखली होती. प्रमोदचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावर मारेकऱ्यांनी त्याचा मृतदेह लिंबाच्या झाडापासून शेतात पंधरा ते वीस फूट अंतरावर फरपटत नेऊन टाकून दिल्याचे आढळून आले. शेतकऱ्याने तत्काळ पहूर पोलिसांची संपर्क केला. पोलिस निरीक्षक प्रतापराव इंगळे, जामनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे, उपनिरीक्षक संजय बनसोड, किरण गर्जे, तालुका समादेशक भगवान पाटील, रवींद्र देशमुख, विनय सानप, ज्ञानेश्वर ढाकरे, गोपाल गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली.
.



