👁 10 Views

तानाजी सावंत समर्थकांची शिवसेनेतून हकालपट्टी

Pandharpur Live : 
उस्मानाबाद झेडपीच्या निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडीच्यासोबत न जाता भाजपसोबत जाऊन पुतण्याला उपाध्यक्षपदी बसविणारे सावंत आणि त्यांच्या कृतीचे समर्थन करणारे सोलापूरचे सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांची शनिवारी हकालपट्टी करण्यात आली आहे. 
त्यानंतर रविवारी पंढरपूर विभागाचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांचा पदभार काढून कुर्डुवाडीचे धनंजय डिकोळे, तर सोलापूर शहर शिवसेनेचे अध्यक्ष हरिभाऊ चौगुले यांचा पदभार काढून नगरसेवक गुरूशांत धुत्तरगावकर यांच्याकडे देण्यात आला आहे.
मोहोळ तालुकाप्रमुख महेश देशमुख यांचासुद्धा पदभार काढण्यात आला आहे. त्यांच्या जागी अशोक भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सरकार स्थापन झाल्यावर पुन्हा मंत्रीपद मिळेल, असा तानाजी सावंत यांना विश्वास होता. मात्र, त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे तानाजी सावंत यांनी ‘मातोश्री’वर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंत्रिपदासाठी पुन्हा येणार नाही, असा इशारावजा निर्धार व्यक्त केला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी त्यांना जय महाराष्ट्र केल्याची चर्चा रंगली होती. यानंतर मागील आठवडय़ात उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तानाजी सावंत यांनी भाजपला अध्यक्षपदासाठी साथ देत पुतण्या धनंजय सावंत यास उपाध्यक्ष करत शिवसेनेला धक्का दिला.


तानाजी सावंत यांच्या या बंडाच्या भूमिकेमुळे शिवसेना नेतृत्वासह उस्मानाबाद-सोलापूर येथील शिवसैनिकांत नाराजी पसरली. सावंत यांच्या मंत्रिपदासाठी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे लक्ष्मीकांत पाटील यांना जिल्हाप्रमुखपदावरून दूर करत माजी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली.

पक्षसंघटनात्मक चर्चा करण्यासाठी बैठक झाली. तानाजी सावंत यांच्यावर कारवाईबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. केवळ पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नियुक्त्या करण्याचे ठरले आहे. सावंत यांची प्रकृती बरी नसल्याने ते बैठकीस नव्हते. ते काही दिवसांनी येऊन भेटणार आहेत.– विनायक राऊत

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *