पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- मुंबई-ठाणे-पुण्यासह ‘रेड झोन’मधील जिल्ह्यात मद्यप्रेमींना दिलासा देणारी बातमी हाती आली आहे. ‘रेड झोन’मध्ये येणाऱ्या महाराष्ट्रातील जिल्ह्यात मद्य विक्रीला सशर्त परवानगी मिळाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव भूषण गगरानी यांनी यासंदर्भात माहिती दिली.
‘कोरोना’चा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह 14 जिल्हे ‘रेड झोन’मध्ये आहेत. सुरुवातीला केवळ ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये मद्य विक्रीला सशर्त परवानगी होती, मात्र आता ग्रीन, ऑरेंज आणि रेड या तिन्ही झोनमध्ये, बाजारपेठा आणि मॉलमध्ये नसलेल्या अशा स्वतंत्र मद्यविक्री दुकानांना परवानगी मिळाली आहे.
तीनही क्षेत्रातील बाजारपेठा व मॉलमध्ये नसलेल्या, स्वतंत्र अशा दारूच्या दुकानांसाठी ही परवानगी देण्यात आली आहे. यात ग्राहकांना एकमेकांपासून 6 फुटांचे अंतर ठेवावे लागणार आहे, तसेच एका वेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक दुकानात असणार नाहीत हेही सुनिश्चित करावे लागणार आहे. कोरोनाच्या संकटात संपुर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्यानं सरकारचा मोठा महसूल बुडत असल्यानं मद्यविक्रीची दुकाने खुली करण्याचा निर्णय घेतला आहे.
रेड झोन (14) :
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, पालघर, नाशिक, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा, धुळे, अकोला, जळगाव
ऑरेंज झोन (16) :
रायगड, अहमदनगर, अमरावती, बुलडाणा, नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, नांदेड, चंद्रपूर, परभणी, सांगली, लातूर, भंडारा, बीड
ग्रीन झोन (6) :
उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली, वर्धा


