👁 5 Views

नाशिक: शिव्या दिल्याने डोक्यात दगड घालून मजुराचा खून

 

शिव्या देण्याच्या व जुन्या भांडणाच्या कारणामुळे मजुरी करणाऱ्या नातेवाइकांमध्ये हाणामारी होऊन दोघांनी ४० वर्षीय मजुराच्या डोक्यात दगडाने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.


घटना चांदवड तालुक्यातील धोंडगव्हाणवाडी गावाच्या शिवारात घडली.

तालुक्यातील धोंडगव्हाणवाडी येथील पप्पू पठाण यांच्या मळ्यात सुरगाणा तालुक्यातील आमदा, हातरुंडी येथील हिरामण जाधव (४०) व पत्नी मीना जाधव (३५) हे शेतमजुरीची कामे करतात. त्यांच्या सोबत त्यांचे नातेवाईक जालिंदर जाधव (१९, रा. पासर पाडा, ता. सुरगाणा) व देवीदास पवार (४०, रा. आमदा, सुरगाणा) हेदेखील शेतमजुरीची कामे करीत होते. 


हिरामण जाधवने जालिंदर व देवीदास यांना शिव्या दिल्याने त्यांच्यात वाद झाला. यावेळी हाणामारीत जालिंदर व देवीदास यांनी हिरामण जाधव यांच्या डोक्यात दगड मारल्याने ते जमिनीवर कोसळले होते. यावेळी हिरामण हे रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडल्याचे पाहून जालिंदर व देवीदास हे दोघेही घाबरले. 


त्यांनी मृत हिरामण जाधव यांचा मृतदेह भास्कर शंकर तिडके या शेतकऱ्याच्या शेत गट नंबर ५६१ मधील द्राक्षबागेत नेऊन टाकला व तेथून पळ काढला होता. या घटनेची माहिती वडनेरभैरवचे सहायक पोलिस अधिकारी मयूर भामरे यांना समजताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून आरोपी जालिंदर व देवीदास यांना ताब्यात घेतले आहे.

रात्री उशिरा या घटनेबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपींना गुरुवारी (दि. ६) चांदवड न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश माने यांनी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस अधिकारी भामरे अधिक तपास करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *