👁 8 Views

माढ्यात प्लॉट नावावर करत नाही म्हणून पतीने गळा आवळुन केली पत्नीची हत्या!


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-

पत्नी प्लॉट नावावर करत नाही म्हणून पतीने तिचा शारिरीक आणि मानसिक छळ करुन तिचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना माढा (जि.सोलापूर)  येथे घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.7) रात्री दहाच्या सुमारास माढ्यातील शुक्रवार पेठ परिसरातील मोमीन गल्लीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.  

सना इरफान मोमीन (वय-27) असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती इरफान रजाक मोमीन, सासरा आणि सासूवर खूनाचा गुन्हा दाखल करून आज (शनिवार) सकाळी तिघांना अटक केली आहे. सनाचे वडिल महंमदमुसा अन्सारी यांनी माढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


पोलिसांनी केलेल्या चौकशीत पती इरफाने खूनाची कबुली दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सना आणि इरफानचे काही वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्यांना सहा वर्षाचा मुलगा आणि तीन वर्षाची मुलगी आहे. परंतु लग्नानंतर दोन महिन्यांनी माहेराहून काहीच आणले नाही म्हणून तिचा छळ करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर सनाच्या नावावर उस्मानाबाद येथे एक प्लॉट आहे. हा प्लॉट आपल्या नावावर करुन दे म्हणून तिला अनेकवेळा मारहाण करण्यात आली होती. तसेच पती इरफान तिच्या चारित्र्यावर सतत संशय घेऊन तिला मारहाण करत होता. यावरून शुक्रवारी रात्री वाद निर्माण झाला. याच वादातून त्याने पत्नी सनाचा गळा दाबून खून केला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. तर सनाच्या नातेवाईकांनी जो पर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला नाही. अखेर आज सकाळी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली. पुढील तपास माढा पोलीस करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *