सोलापूर जिल्ह्यात विविध सहकारी संस्थांचे जाळे निर्माण करून लाखो कुटुंबास आधार देणारा वटवृक्ष अखेर कोसळला.
सहकारतपस्वी, राजकारणातले संत म्हणून सबंध महाराष्ट्रात गौरविले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील जेष्ठ नेते, माजी आमदार कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक (वय 84) यांचे काल दि. 17 ऑगस्ट रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले.
गेल्या कांही दिवसांपासून ते कोरोनाशी झुंज देत होते. कोरोनाच्या संसर्गामुळे पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु काल रात्री उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
परिचारक यांच्या वाडयाबाहेर (कै.)कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांनी गेल्या 50 वर्षाच्या आपल्या राजकीय कारकिर्दीतील स्वच्छ कारभारभारामुळे ‘आदर्श राजकीय नेता’ म्हणुन महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रात आपला अमिट ठसा उमटविलेला आहे. एक स्वच्छ व पारदर्शी, सर्वसामान्यांच्या हितासाठी राजकारण करणारे राजकारणातील संत म्हणून महाराष्ट्रातील राजकीय पटलावर त्यांची ख्याती होती.
पंढरपूर तालुक्यात भीमा साखर कारखाना, पांडुरंग साखर कारखाना या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सहकार क्रांती घडवली, सहकारी सोसायट्या, दुध संघ आदी सहकारी संस्थांचे जाळे निर्माण करून त्यांनी शेतक-यांच्या जीवनात सोनेरी क्षण आणले. गावागावात, वाड्या वस्त्यांवर विकासाची गंगा त्यांच्यामुळेच पोहोचली. एस. टी. महामंडळाचे अध्यक्षपद भुषवुन तोट्यात असलेले महामंडळ, नफ्यात आणणारे, दामाजी साखर कारखान्यासारख्या बंद पडलेल्या संस्था उभारणेसाठी निःस्पृह वृत्तीने झटणारे सुधाकरपंत परिचारक हे सहकारातील डॉक्टर म्हणून ओळखले जात.
प्रतिपांडुरंग म्हणून सर्वसामान्यांच्या मनात वसलेले हे श्रध्दास्थान कोरोनाशी लढत असताना अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना सुरू होत्या परंतू अखेर नियती कठोर झाली आणि लाखोंच्या काळजाला चटका लावून कर्मयोग्याने आपली इहलोकीची यात्रा संपवली.
मोजक्या लोकांच्या उपस्थिती पुण्यातील वैकुंठ स्मशानभुमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
प्रत्येकाच्या मनातील पांडुरंग स्वरूप ‘देव’ अंतिम दर्शन न देताच निघुन गेला याचे शल्य आणि ही वेदना मात्र कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागलीय….. पंढरपूर लाईव्ह कडून कर्मयोगी आदरणीय सुधाकरपंत परिचारक यांना भावपुर्ण श्रध्दांजली.
परिचारक कुटुंबातील अन्य काही सदस्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला असुन त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू आहेत.
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या जिवनातील महत्वपूर्ण कार्याची माहिती














