
Pandharpur Live Online : संपूर्ण देशाला हादरवून साेडणाऱ्या व 10 निष्पाप बालकांचा बळी घेणाऱ्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्नितांडवाला जबाबदार काेण? हा एकच प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे. त्या रात्री विशेष नवजात अतिदक्षता कक्षात नियुक्त असलेले ‘ते’ डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचारी काेण? असा प्रश्नही आता उपस्थित झाला आहे. कक्षाला बाहेरून कडी लावून गेलेल्या ‘त्या’ नर्सचे नाव सांगण्यास प्रशासन दाेन दिवसांपासून टाळाटाळ करीत असून आराेग्य यंत्रणेतील कुणीही या विषयावर बाेलायला तयार नाही. यामागचे काय गाैडबंगाल आहे, हे कळायला मार्ग नाही.
धुराचे लाेळ व आगीमुळे दहा बालकांचा करुण अंत झाला. या कक्षात डाॅक्टर, नर्स, वार्ड बाॅय असणे अपेक्षित असते. विशेष म्हणजे हा कक्ष अतिशय संवेदनशील म्हणून ओळखला जाताे. तेथे बालकांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी परिचारिकांची नियुक्ती असते. नियमाप्रमाणे इनक्यूबेटरजवळ नर्स असणे बंधनकारक आहे. मात्र घटना घडली त्यावेळी नर्स कक्षात नसल्याची माहिती आहे.
दोषींवर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल- मुख्यमंत्री
भंडारा येथे घडलेली दुर्घटना अत्यंत भीषण आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे. ही घटना कशी घडली याची सध्या चौकशी सुरु आहे. त्यामुळे चौकशीतून सत्य बाहेर येईलच. पण, अशी दुर्घटना पुन्हा राज्यात घडणार नाही, याकरता प्रयत्न केले जाणार आहे. तसेच या दुर्घटनेत दोषींवर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल’, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले आहे.
सरकारी रुग्णालयाचे ऑडीट करण्याचे आदेश
राज्यातील सर्व खासगी आणि सरकारी रुग्णालयातील सेफ्टी ऑडिट करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले आहेत. यासाठीचे सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले गेले आहेत.
