Pandharpur Live Online: टेंभुर्णी (ता. माढा) येथील तीन पोलिस कर्मचार्यांना पैशासाठी वाहनधारकांना अडवून नाहक त्रास देण्याच्या कारणावरून शुक्रवारी निलंबित करण्यात आले. यामध्ये एका महिला कॉन्स्टेबलसह तिघांचा समावेश आहे. ग्रामीण पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी यासंदर्भात गुप्त चौकशी करून तडकाफडकी कारवाईचा बडगा उगारला.
पोलिस कॉन्स्टेबल रमेश कुरनार, प्रवीण शिंपाळे व प्रियांका आखाडे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. तिघेही टेंभुर्णी पोलिस ठाण्यात कार्यरत होते. हे तिघेजण टेंभुर्णी पोलिस ठाण्याच्या हद्दीत लोकांना अडवून तसेच चारचाकी वाहनधारकांना अडवून पैशासाठी नाहक त्रास देत असल्याच्या तक्रारी होत्या.
व्यापार्यांनासुद्धा विविध कारणांनी पकडून नेहमी दमदाटी करून पैशाची मागणी करीत असल्याच्या तक्रारी होत्या. यासंदर्भात काही जणांनी टेंभुर्णी विभागाचे पोलिस उपअधीक्षक विशाल हिरे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. एकूणच या तिघांबद्दल वाढत चाललेल्या तक्रारींसंदर्भात हिरे यांनी तेजस्वी सातपुते यांना कळविले होते. पडताळणीत तक्रारींबाबत तथ्यता आढळून आली. त्यामुळे त्या तिघांना तडकाफडकी तत्काळ निलंबित केले. त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू केली आहे.

