👁 8 Views

शेतकऱ्यांचे थकीत बील देण्यासाठी साखर कारखान्याची 25 एकर जमीन विकली परंतु शेतकऱ्यांची बीलं अद्याप थकीत! भाजपा नेत्यावर शेतकरी संघटनेचा खळबळजनक आरोप


 

Pandharpur Live Online: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील अंबा सहकारी साखर कारखान्याची २५ एकर जमीन पंकजा मुंडे समर्थक भाजपनेते रमेश आडसकर यांनी विकल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या एफआरपीची रक्कम देण्यासाठी २५ एकर जमीन विकण्यास साखर आयुक्तांनी परवानगी दिली होती.

मात्र, ही जमीन विकूनही अद्याप शेतकऱ्यांचे पैसे त्यांना मिळाले नाहीत. त्यामुळे जमीन विक्री करून मिळालेले पैशे गेले कुठे? असा सवाल शेतकरी विचारत आहेत.

संबंधित कारखाना भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक रमेश आडसकर यांच्या ताब्यात आहे. साखर कारखानदारीच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे देण्यासाठी कारखान्याची जमीन विक्री केली आहे. या कारखान्यात उसापासून केवळ साखर बनली असं नाही तर वेगवेगळे उप पदार्थ देखील बनले आहेत. असं असूनही शेतकऱ्यांचे पैसे का दिले नाहीत? असा प्रश्न शेतकरी संघटनेकडून केला जात आहे. कारखान्याच्या जमीन विक्रीचा व्यवहार संशयास्पद असून यामध्ये आर्थिक गैर व्यवहार झाल्याचा संशय आहे, म्हणून हा आदेश मागे घेण्यात यावा अशी मागणीही शेतकरी संघटनेकडून होत आहे.

अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याला 7 जून 2021रोजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी अटी व शर्ती घालून शेतकऱ्यांच्या एफआरपीची रक्कम देण्यासाठी २५ एकर जमीन विकण्याची परवानगी दिली होती. शेतकऱ्यांच्या एफआरपीचे पैसे व्याजासह न मिळाल्यामुळे साखर आयुक्तांनी घातलेल्या अटींचे अंबासाखरने उल्लंघन केल्याचं स्पष्ट होतं आहे. त्यामुळे संबंधित प्रकाराची गंभीर दखल घेऊन साखर आयुक्तांनी जमीन विक्रीला तातडीनं स्थगिती द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे भाई मोहन गुंड यांनी केली आहे.

शेतकऱ्याच्या एफआरपीचे पैसे देण्यासाठी आम्ही २५ एकर जमीन विकली आहे. मात्र त्यातील एक रुपयाही इकडे तिकडे गेलेला नाही. यातून शेतकऱ्यांच्या उसाची थकीत बिलं देण्यात आली आहेत. तसेच हा व्यवहार पारदर्शक झाला असून कारखान्यावर प्रशासक नेमल्यानंतर कारखान्याला कुठल्याही बँकेनं कर्ज दिलं नाही. त्यामुळे सभासदांच्या ठेवीमधून हा कारखाना चालू ठेवला आहे. यामधून शेतकऱ्यांना फायदा व्हावा हाच मुख्य उद्देश असल्याचं भाजपनेते आणि चेअरमन रमेश आडसकर यांनी सांगितलं आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *