👁 9 Views

कराड- पंढरपूर मार्गावर बोरवेल ट्रक आणि छोटा हत्तीची समोरासमोर भीषण धडक : सुलतानवाडीचे 2 युवक ठार

 


आटपाडी | कराड-पंढरपूर महामार्गावर विभूतवाडी(आटपाडी) येथे बोरवेल ट्रक आणि छोटा टेम्पो या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोघेजण ठार झाले. महेश विजय फडतरे (वय- 29) व गणेश नानासाहेब फडतरे (वय- 19, दोघेही रा.

सुलतानवाडी, ता. कोरेगाव, जि. सातारा) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. तर निशांत फडतरे हा गंभीर झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी रात्री कराड-पंढरपूर महामार्गावर विभूतवाडी गावाच्या पश्‍चिमेला सातारा जिल्ह्याकडे जाणार्‍या रस्त्यावर ओढा आणि वळण रस्त्यावर हा अपघात झाला. कोरेगाव येथून छोटा टेम्पो मालाची डिलिव्हरी करून परत निघाला होता. सातारा येथून दिघंचीकडे बोरवेल ट्रक निघाला होता. यावेळी या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली.



या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातग्रस्त वाहनांतील जखमींना ग्रामस्थांनी बाहेर काढले. गंभीर जखमींना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मायणी येथील हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना एकाचा मृत्यू झाला. दुसर्‍याचा आटपाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. निशांत फडतरे यांच्यावर सातारा येथील जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातात मयत झालेले दोघेही कोरेगाव तालुक्यातील सुलतानवाडीचे आहेत. शेतकरी कृषी यंत्र एजन्सीचे साहित्य पोहोचवुन ते परत निघाले असताना, काळाने त्यांच्यावर घाला घातला. गुरुवारी रात्री अपघातग्रस्त वाहनांतील जखमींना बाहेर काढताना एका वाहनातून ग्रामस्थांना 32 हजार रुपयांची रक्कम सापडली. मदती दरम्यान सापडलेली ही रक्कम ग्रामस्थांनी वाहन मालकाला परत दिली. या कृतीतून विभूतवाडी ग्रामस्थांकडून माणुसकीचे दर्शन दिसून आले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *