👁 7 Views

भाविकांच्या गर्दीने फुलला सोलापूर- तुळजापूर भक्तिमार्ग

 आईराजा उदो-उदो’ ‘जय भवानी, जय शिवाजी’चा गजर करीत महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशमधील लाखो भाविक कोजागरी पौर्णिमेनिमित्त सोलापूरहून तुळजापूरकडे निघाले आहेत. संपूर्ण सोलापूर-तुळजापूर महामार्ग भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे.


महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातील लाखो भाविक कोजागरी पौर्णिमेनिमित्त आई तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी पायी जातात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना निर्बंधांमुळे पायी मार्ग बंद ठेवण्यात आला होता. यंदाच्या वर्षी मात्र निर्बंध नसल्यामुळे मोठय़ा संख्येने भाविक देवीच्या दर्शनाला जात आहेत. भाविकांच्या गर्दीमुळे सोलापूर ते तुळजापूर महामार्ग वाहनांसाठी दोन दिवस बंद ठेवण्यात आला असून, ठिकठिकाणी भाविकांसाठी प्रसादाची सोयही करण्यात आली आहे.


विजयादशमीनंतर कर्नाटक, आंध्र प्रदेशातील भाविक तुळजापूरकडे पायी निघाले आहेत. शुक्रवार व शनिवारी सोलापुरात परराज्यांतील लाखो भाविक दाखल झाले होते. विजापूर, गुलबर्गा, इंडि, चडचण, आळंद, अक्कलकोट, दक्षिण सोलापूरसह राज्यातील भाविक तुळजापूरकडे पायी निघालेले आहेत.


यंदाच्या वर्षी भाविकांत प्रचंड उत्साह असून, यात अबालवृद्धांसह महिलांची संख्या अधिक आहे. या भाविकांसाठी सामाजिक संघटना, तरुण मंडळांकडून जागोजागी पाण्याची, चहानाष्टा, प्रसाद वाटपाची, तर काही ठिकाणी प्राथमिक आरोग्य मदतकेंद्रे उभारण्यात आली आहेत. पावसाने उघडीप दिल्याने भाविकांना दिलासा मिळाला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *