👁 8 Views

वृद्धेला अग्निदाह देताच नदीला आला पुर

 नाचनवेल : आमदाबाद (ता.कन्नड) येथे मंगळवारी (ता.१८) रात्री एका वृद्धेचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यानंतर बुधवारी या महिलेवर स्मशानभूमी नसल्याने अंजना नदीपात्रात अंत्यविधी पार पडला.


मात्र, अग्निदाह देताच जोरदार आलेल्या पावसामुळे नदीला पूर आला. यामुळे जोरदार वाहणाऱ्या पाण्यात मृतदेहाची हेळसांड झाली. स्मशानभूमी नसल्याने कुटुंबीयांना अडचणींचा सामना करावा लागला. यामुळे मरणाने केली सुटका अन् पुराने छळले, अशीच काहीशी अवस्था या मृतदेहाची झाली.


शांताबाई गोटीराम बनकर (वय ८२) असे मृत वृद्धेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सदर वृद्धेचे मंगळवारी (ता.१८) रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर बुधवारी (ता.) सकाळी दहाच्या सुमारास येथील अंजना नदीपात्रात अंत्यविधी उरकण्याचे नियोजन सुरू होते. त्यासाठी नदीकाठी ट्रॅक्टरने जागा तयार करून सरणासाठी पुरेशी लाकडे व टायर रचून अग्निदाह देण्यात आला.


मात्र, याचवेळी नदीच्या वरील भागात जोरदार पाऊस झाल्याने नदीला पूर आला. हे लक्षात येताच बनकर कुटुंबातील सदस्यांनी सरण मंदगतीने जळू नये म्हणून विविध उपाययोजना केल्या. मात्र, कुटुंबातील सदस्यांनी पुराच्या पाण्यात अक्षरशः जीव धोक्यात घालून आग विझणार नाही, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

अखेर तळाशी राहिलेले लाकडे जळत असताना पूर अचानक वाढला. त्यामुळे नातेवाइकांची तारांबळ उडाली. अखेर नाही व्हायचे तेच झाले. अग्नी दिलेल्या खालील भागाचे सरण विझून वाहून गेले. येथे स्मशानभूमी असती मृतदेहाची हेळसांड झाली नसती.


दरम्यान, नदीकाठी जुनी स्मशानभूमी असून दोन वर्षांपूर्वी नदीला मोठा पूर आल्याने तेथील नदीकाठचा भाग खचल्याने रस्ता वाहून गेला. त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही. ग्रामपंचायतीने जुन्या स्मशानभूमीसाठी नवीन रस्ता व संरक्षक भिंत करून द्यावी, अशी मागणी सर्व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. याआधी गावची समस्या लोकप्रतिनिधी मांडताच आ.उदयसिंग राजपूत यांनी नवीन स्मशानभूमीसाठी पाच लाखांचा निधी मंजूर केला आहे. परंतु जागेअभावी हे काम रखडलेले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *