महावितरणाकडून शेतीसाठी रात्री वीज पुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पिकांना पाणी देण्यासाठी त्यांना रात्रीचा दिवस करावा लागत आहे.
अशातच अनेकदा ही गोष्ट शेतकऱ्यांच्या जीवावरही बेतत आहे. रात्रीच्या अंधारात वीजेच्या धक्क्याने किंवा सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याच्या घटना अनेकदा समोर येतात.
मात्र, तरीही याकडे गांभीर्याने लक्ष दिलं जात नाही. अशातच आता आणखी एका शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
शेतात रात्री पिकाला पाणी देत असताना तरुण शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बीडमधून समोर आली आहे. गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका गावातून ही घटना उघडकीस आली.
रामेश्वर भागवतराव लोणकर असं मयत शेतकऱ्याचं नाव आहे. या घटनेनंतर नागरिकांनी महावितरणाविरोधात संताप व्यक्त केला आहे.
शेतासाठी रात्रीची वीज देवून महावितरण किती शेतकऱ्यांचा जीव घेणार? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. महावितरणाकडून शेतीसाठी रात्री वीज पुरवठा केला जात असल्याने ही गोष्ट शेतकऱ्यांच्या जीवावर बेतत आहे. त्यामुळे दिवसाची वीज शेतीसाठी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.





