दोन दिवसावर येऊन ठेवलेल्या साक्षगंधासाठी बॅग खरेदी करणाऱ्यासाठी भावासोबत दुचाकीवर गेलेल्या सीआरपीएफ जवान असलेल्या बहिणीचा समोरून येणाऱ्या दुचाकीला कट मारल्याने बहीण-भावाची दुचाकी रस्त्यावर कोसळल्यानंतर अचानक मागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली डोके चिरडून बहीण जागीच ठार तर भाऊ गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना भंडारा जिल्ह्यात घडली.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपुलावर ही घटना घडली. किरण सुखदेव आगाशे (25) असे मृत तरुणीचे नाव आहे, तर लोकेश सुखदेव आगाशे (21), रा. निलज खुर्द, ता. मोहाडी, असे जखमीचे नाव आहे.
किरण ही मुंबई सीआरपीएफ कॅम्पमध्ये नोकरीला होती. ती लोकेशसोबत तुमसर येथे बॅग खरेदीसाठी आली होती. खरेदी करून दुचाकीने ते (एमएच 36 ए 6693) निलजकडे जात होते. देव्हाडी उड्डाणपुलावरून जाताना समोरून आलेल्या दुचाकीने कट मारल्याने दोघेही भाऊ बहिन रस्त्यावर पडले.
दरम्यान मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकखाली किरणचे डोके चिरडले गेले आणि ती जागीच ठार झाली. घटनास्थळावर रक्ताचा सडा पडला होता. मेंदूचा चेंदामेंदा झाला होता. तर भाऊ लोकेश हा गंभीर जखमी असून त्यांच्या वर उपचार सुरू आहे.



