पंढरपूर, दिनांक २३: आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेल्या वारकऱ्यांना आयुष सेवा सुविधा केंद्रामार्फत पारंपरिक आयुर्वेदिक उपचार पद्धतीने आरोग्यदायी सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या सुविधेचा लाभ वारकरी घेत आहेत.
पंढरपूर येथील तीन रस्ता येथील महाआरोग्य शिबिर, चंद्रभागेच्या तीरावरील आरोग्य केंद्र वाळवंट आणि आरोग्य केंद्र ६५ एकर या तीन ठिकाणी आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कार्यालयाच्यावतीने पंढरपुरात येणाऱ्या वारकरी भक्तांना सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी “आयुष सेवा सुविधा केंद्र” उभारण्यात आले आहे.

सकाळपासून या आयुष सेवा सुविधा केंद्रावर वारकऱ्यांना आयुर्वेदिक, होमिओपॅथी औषधांचे वाटप, योगाबाबत मार्गदर्शन, स्नेहन-स्वेदन (वाफ देणे), वारकऱ्यांसाठी तेल-मसाज, विद्धकर्म, अग्निकर्म, चरणसेवा करण्यात येत आहे. आयुर्वेद, होमिओपॅथी महाविद्यालयांचे डॉक्टर, प्राध्यापक आणि इंटर्न्स आयुष सेवा देत आहेत. तर शेठ चंदनमल मुथा आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय, सातारा आणि नेचरफिट संस्थेतर्फे औषध वाटप करण्यात येत आहे.

केंद्रीय आयुष मंत्रालयातर्फे नियुक्त करण्यात आलेले नोडल अधिकारी चंद्रकांत काटकर, युवराज वाघ, डॉ. हर्षल जाधव, डॉ. सुधीर घोडके, डॉ. अर्चना घोडके आयुष सेवा सुविधा केंद्रात उपस्थित राहून वारकऱ्यांना सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहेत.
*

