👁 8 Views

घरफोड्यांचा भडका , ६४ लाखांचा ऐवज चोरला

 

    पुणे : पुण्यात घरफोड्यांनी पुणेकर हैराण अन् पोलिस परेशान झाले आहेत. नित्यनियमाने होणाऱ्या घरफोड्यांचा घटनांनी पुणेकरांमध्ये दहशतच बसवली असून, सिंहगड आणि कोथरूड भागात चोरट्यांनी दोन फ्लॅट फोडून तब्बल ६४ लाखांवर डल्ला मारला आहे. धायरीत चोरट्यांनी पानशेतच्या उपसंरपचाचे घर फोडून २३ लाखांचा ऐवज चोरला आहे. तर, खासगी कंपनीतून निवृत्त झालेल्या व्यक्तीच्या घरातून ४१ लाखांचा ऐवज चोरला आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून या चोरट्यांचा माग काढला जात आहे.


    याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात आशिष पासलकर (वय ३३, रा. धायरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात तीन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार भरदुपारी घडला आहे. तक्रारदार हे मुळचे पानशेतमधील असून, ते पानशेतचे उपसंरपच आहेत. त्यांचे हॉटेल देखील आहे. राहण्यास धायरीमधील पार्थ संकुल येथे आहेत. हॉटेलवर गर्दी झाल्यानंतर ते त्याच ठिकाणी थांबतात.


    दरम्यान, थर्टीफस्टच्या निमित्त ते हॉटेलात गेले होते. त्यावेळी गर्दी असल्याने ते त्याच ठिकाणी थांबले होते. यादरम्यान, चोरट्यांनी दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश केला. तसेच, घरातील सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण २३ लाख ५३ हजारांचा ऐवज चोरून नेला. एक जानेवारी रोजी हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. सिंहगड पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, तक्रारदार यांच्या सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. त्यात चोरटे कैद झाले आहेत.


    तीन चोरटे दुचाकीवरून आल्याचे यात दिसत आहे. पण, त्यांनी चेहऱ्याला मास्क लावला होता. त्यामुळे त्यांची ओळख पटू शकलेले नाही. परंतु, पोलिसांकडून या सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा माग सुरू करण्यात आला आहे. दुसरी घटना कोथरूडमधील पौड रोडवर घडली असून, चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून तब्बल ४१ लाख १६ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी ७९ वर्षीय व्यक्तीने कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार पौड रस्त्यावरील रामबाग कॉलनीत एका सोसायटीत राहण्यास आहेत. ते एका खासगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. त्यांची एक मुलगी दुबईत असते. तिला भेटण्यासाठी ते १३ डिसेंबर रोजी गेले होते. ते परत २७ डिसेंबर रोजी आले.

    यादरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व घरातील ३२ लाखांचे दागिने, हिऱ्याचे ७ लाखांचे दागिने व रोकड असा एकूण ४१ लाख १६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्यानूसार चोरट्यांचा माग काढण्यास सुरूवात केली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *