राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वरील माना फाट्यानजीक उमा नदीच्या पुलाजवळ ट्रेलर व कंटेनरचा भीषण अपघात होऊन कंटेनर चालक जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवार, 6 जानेवारी रोजी दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास घडली असून, यात ट्रेलरमधील 1 जण जखमी आहे.
प्राप्त माहितीवरून अकोल्याकडून अमरावतीकडे जाणारा कंटेनर क्र. डी. डी.03 पी. 9744 च्या चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून अमरावतीकडून अकोल्याकडे लोखंडी सळई घेऊन जाणारा ट्रेलर क्र. आर जे 47 जि ए 2641 ला समोरून जबर धडक दिली.
यात कंटेनरचे टायर फुटून दोन्ही वाहन अनियंत्रित होऊन रोडवरून अंदाजे 15 ते 20 फूट खाली पडून उलटले.यात कंटेनर डी. डी.03 पी. 9744 चा चालक नौशाद अहमद शेख वय 50 वर्ष हा कंटेनर खाली दबल्याने जागीच ठार झाला असून ट्रेलर क्र. आर जे 47 जि ए 2641 त्रिपाल सिंग हा जखमी झाला.
या घटनेची माहिती मान्याचे ठाणेदार कैलास भगत यांना मिळताच त्यांनी पोलिस नंदकिशोर टिकार, संदीप सरोदे, उमेश हरमकर, जयकुमार मंडावरे, रमाकांत वाघमारे, सुशील आठवले या सहकार्यांना घेऊन त्वरित घटनास्थळी धाव घेतली.
तसेच अपघातातील मृत व जखमीस बाहेर काढून प्राथमिक आरोग्य केंद्र आपत्कालीन पथकाचे स्वप्नील चौधरी, गौतम निंडोरे, रितेश चिनाप्पा यांच्या सहकार्याने जखमी उपचारासाठी व मृत नौशाद अहमद शेख याचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता मूर्तिजापूर येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय येथे रवाना केले. वृत्त लिहिस्तोवर माना पो. स्टे. येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.



