सोलापूर: अपघाताचा हॉटस्पॉट बनलेल्या मौलालीचा माळ येथील चौकात डंपरखाली चिरडून दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. मौलालीचा माळ येथील चढावर हा अपघात झाला आहे शहरातील घाडगे पाटील कन्स्ट्रक्शनची खडी वाहणारा डंपर क्रमांक एम एच 16- ए ई 9599 हा शहरातील राजयोग हॉटेल ते माऊली नगर दरम्यानच्या रस्त्यावरून डाव्या बाजूला गुळसडीकडे वळणाऱ्या रस्त्याकडे निघाला होता.
यावेळी पॅशन मोटारसायकल क्र. एम एच 42 एन 5382 वरील दोघांपैकी एक जण या वळणाऱ्या डंपरच्या मागच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला आहे. तर पाठीमागे बसलेला व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.
या अपघातानंतर डंपरचालक वाहन तसेच सुरू ठेवून घटनास्थळावरून पसार झाला आहे. जखमी व्यक्तीला 108 रुग्णवाहिकेतून करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर मृत व्यक्तीचा मृतदेह आसिफ पिंजारी यांच्या रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयाकडे पाठवण्यात आला आहे. या अपघातानंतर घटनास्थळावर हा अपघात पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. घटनास्थळावर करमाळा पोलीस कॉन्स्टेबल आनंद पवार हे दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू आहे.