समस्या सुटेपर्यंत पाठपुरावा करणार ! – निलकंठ शिंदे, अध्यक्ष, शहीद अशोक कामटे रेल्वे प्रवासी संघटना, सांगोला
पंढरपूर Live 6 NOVEMBER 2017
सोलापूर आणि मिरज अंतर्गत चालणार्या रेल्वेच्या पॅसेंजर, फास्ट पॅसेंजर आणि एक्सप्रेस यांच्या तिकीट दरासंदर्भात मनमानी कारभार चालू असून त्याचा फटका सामान्य प्रवासी आणि भक्तांना बसत असून, याविषयी प्रवाश्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दोन वर्षापुर्वी सकाळी अत्यंत्य चांगला प्रतिसाद असणारी सोलापूर-कोल्हापूर एक्सप्रेस अचानक बंद करून, काही ठराविक व्यापार्यांच्या सोयीसाठी रात्री करण्यात आली. या निर्णयाला अनेक संघटनांनी तीव्र विरोध केला; मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही.
काही वर्षापासून सायंकाळी 6.25 वाजता मिरजेतून सुटणारी मिरज-पंढरपूर पॅसेंजर अचानक नाव बदलून फास्ट पॅसेंजर करण्यात आली. नुसते नाव बदलले नाही, तर दरात पुष्कळ वाढ करण्यात आली. मात्र वेळेत आणि थांब्यात फारसा बदल केला नाही. मागील वर्षीपासून पुन्हा मिरज-सोलापूर पॅसेंजर चालू करण्यात आली. मात्र काही दिवसांनी त्यातही बदल करण्यात आला आणि यास एक्सप्रेसचा दर्जा देण्यात आला. परंतू या एक्सप्रेसला एकही आरक्षित डबा जोडण्यात आला नाही. पंढरपूरला वारीला येण्यासाठी वारकरी पुष्कळ प्रमाणात रेल्वेने प्रवास करतात. मात्र शासनाने वारकर्यांचा विचार करूनही फारश्या सुविधा देण्याचा प्रयत्न केल्याचा दिसत नाही. उलट वारीदरम्यान बहूतांशवेळा बस अथवा रेल्वेने तिकिट दर वाढवलेले दिसतात.
अनेक वर्षापासून सांगोल्यातून अथवा मिरजेतून थेट मुंबईला रेल्वे चालू करावी, अशी मागणी वारंवार होत असताना प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. प्रत्यक्षात सांगोला तालुक्यातून प्रतिदिन मुंबईला जाणार्यांची संख्या 500 ते 700 आहे. सांगोल्यातून एसटीच्या 4 ते 5 तर खासगी जवळपास 10 बस प्रतिदिन मुंबईला जातात. पंढरपूरातून शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशी आठवड्यातून तीन दिवस पंढरपूरमुंबई फास्ट पॅसेंजर सायंकाळी 6 वाजता आहे. मात्र याच दरम्यान मिरज सोलापूर एक्सप्रेस पंढरपूरला येते. यामाध्यमातूनही काही वेळेचा बदल करून मुंबईला जाणार्या प्रवाश्यांची सोय होऊ शकते याचाही प्रशासनाने विचार करायला हवा. सांगोला-पंढरपूर या रेल्वेस्थानकातून पुष्कळ प्रमाणात तृतीयपंथीय पुरूष रेल्वेत घुसतात, याचाही सामान्य प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागतो. प्रशासनाच्या या मनमानी कारभाराविरोधात प्रवासी संघटना आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत. सांगोल्यातील शहीद अशोक कामटे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष निलकंठ शिंदे यांनी या समस्यांविषयी शेवटपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




