ज्या कारागृहात ड्युटी केली त्याच जेलमध्ये भोसले यांना बसण्याची आली वेळ !
दोन पिस्तुल चोरीप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले निलंबित पोलीस नाईक दत्तात्रय भोसले यांचा जामीन अर्ज पंढरपूर जिल्हा सत्र न्यायाधीश अ.ज.पाटंगणकर यांनी नामंजूर केला. दरम्यान,भोसले यांना कर्जतहून मंगळवेढा कारागृहात वर्ग करण्यात आले असून ज्या कारागृहात गार्ड म्हणून ड्युटी केली त्याच कारागृहात बसण्याची वेळ भोसले यांच्यावर आली असल्याची खमंग चर्चा सुरू आहे.
या घटनेची हकिकत अशी की, सन 2017 मध्ये सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर मंगळवेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परवानाधारकांची शस्त्रे जमा करून घेतली होती. ही शस्त्रे लॉक अप गार्डमधील शस्त्रगार कक्षात सुरक्षिततेच्या कारणास्तव ठेवण्यात आली होती. दि.28 जानेवारी ते 5 मार्च 2017 या दरम्यान दोन पिस्तुल चोरीला गेली होती. खुनप्रकरणात पोलीस नाईक दत्तात्रय भोसले याला कर्जत पोलीसांनी ताब्यात घेतल्यानंतर मंगळवेढा येथील दोन पिस्तुल चोरल्याचे सांगितले होते. गुन्हे अन्वेषनचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी पोलीस वसाहतीमधील भोसले यांच्या निवासस्थानी छापा टाकल्यावर दोन पिस्तुले तसेच बेकायदेशीर एक डबल बॅरल असलेली गण मिळून आली होती. ही शस्त्रे गुन्ह्याचे तपासकामी व पुराव्याकामी पंचासमक्ष जप्त करण्यात आली होती. आरोपी भोसले यांनी जामीन मिळण्यासाठी पंढरपूर जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सरकार पक्षातर्फे यावर हरकत घेवून सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा तपास चालू आहे. आरोपी हा स्वतः पोलीस असून पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असताना गुन्हा केलेला आहे. हत्यार जप्त करून पंचनामा करताना आरोपीची पत्नी समक्ष पंचनामा करून त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले आहे. ही शस्त्रे आरोपीच्या घरात मिळून आली आहेत. या गुन्ह्यात आरोपीशिवाय अन्य कोणी साथीदार आहेत का? याचा तपास सुरू आहे. तसेच आरोपीविरूध्द खुनासारखा गंभीर गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याचा तपास चालू असताना आरोपीस जामीन मंजूर झाल्यास गुन्ह्याचा सखोल तपास होणार नाही असा युक्तीवाद सरकार पक्षातर्फे अॅड.सारंग वांगीकर यांनी केला. तपासातील कागदपत्रे यांचे अवलोकन करून आरोपी भोसले याचा जामीन अर्ज न्यायालयाने नामंजुर केला.
————-
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




