👁 10 Views

कोपर्डीच्या ताईला अखेर मिळाला न्याय.. तिन्ही नराधमांना फाशीची शिक्षा! न्यायालयाच्या निकालाचं सर्वसामान्यातून स्वागत..!

कोपर्डीच्या ताईला अखेर मिळाला न्याय.. तिन्ही नराधमांना फाशीची शिक्षा!
न्यायालयाच्या निकालाचं सर्वसामान्यातून स्वागत..!

पंढरपूर Live 29 NOVEMBER 2017

नगर : कोपर्डी (ता. कर्जत) येथील शाळकरी मुलीवर अत्याचार करुन तिचा खून प्रकरणी तिन्ही नराधम गुन्हेगारांना आज विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली. न्यायालयाने सुनावलेल्या या शिक्षेचे सर्वसामान्य जनतेतून स्वागत होत आहे.  जितेंद्र उर्फ पप्पू बाबूलाल शिंदे (वय 25,रा. कोपर्डी, ता कर्जत), संतोष गोरख भवाळ (वय 30, मूळ रा. खांडवी, हल्ली रा. कोपर्डी), नितीन गोपीनाथ भैलुमे (वय 26, रा. कोपर्डी), अशी या गुन्हेगारांची नावे आहेत. 
कोपर्डी येथे 13 जुलै 2016रोजी आरोपींची शाळकरी मुलीवर अत्याचार करुन तिचा निर्घुणपणे खून केला होता. त्या प्रकरणी कर्जत येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तिन्ही आरोपींविरुद्ध नगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात कट रचून अत्याचार व खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. खटल्यात एकूण 31 साक्षीदार तपासण्यात आले. त्यात वैद्यकीय अधिकारी, पीडित मुलींच्या मैत्रिणी, चुलत आजोबा यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सरकार पक्षाने 24 परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी न्यायालयात मांडली आणि ती सिद्ध केली. शेवटच्या युक्तीवादात सरकार पक्षातर्फे राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तेरा महत्वाचे मुद्दे न्यायालयासमोर मांडले आणि या खटल्याशी निगडीत सर्वोच्च न्यायालयाचे दहा न्यायनिवाड्यांचा संदर्भ दिला. 
न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्यधरून विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी तिघांनाही कट रचणे, बलात्कार करणे, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि खुनाच्या गुन्ह्यात दोषी धरुन वरीलप्रमाणे शिक्षा दिली. सरकार पक्षातर्फे राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी खटल्यात बाजू मांडली. आरोपीतर्फे विधी सेवा प्राधिकरणचे ऍड. योहान मकासरे, ऍड. बाळासाहेब खोपडे, विजयालक्ष्मी खोपडे, ऍड. प्रकाश आहेर यांनी काम चालविले. 
खटल्याची थोडक्‍यात माहिती अशी: कोपर्डी येथील तुकाई लवण वस्ती परिसरात 13 जुलै 2016 रोजी सायंकाळी सात वाजता नववीत शिकणारी शाळकरी पीडित मुलगी आजोबांच्या घरी मसाला आणण्यासाठी गेली होती. मसाला घेऊन ती घराकडे येत असताना जितेंद्र शिंदे याने तिला रस्त्यात अडविले. तिच्याकडील सायकल बाजूला फेकून दिली व रस्त्याच्या बाजूला असलेल्या चारीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिची निर्घृण हत्या केली. 
त्यावेळी तिने प्रतिकाराचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने तिचे दोन्ही हात मोडून टाकले होते. त्यानंतर त्याने तिचा मृतदेह शेताच्या बांधावरील लिंबाच्या झाडाखाली ओढत नेऊन टाकून दिला. दरम्यान मुलगी घरी न आल्याने तिच्या आईच्या सांगण्यावरून चुलतभाऊ आणि त्याच्या मित्रांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना रस्ताच्याकडेला तिची सायकल आढळून आली होती. तसेच पीडितेच्या चपला आणि मसाला तिथेच पडलेला दिसला. चुलतभावाला आरोपी जितेंद्र शिंदे लिंबाच्या झाडाखाली उभा दिसला. लिंबाच्या झाडाकडे जाताच तो पळून गेला. तेव्हा पीडित मुलगी नग्नावस्थेत मृत पडलेली आढलली. चुलतभाऊ आणि मित्राने आरडाओरड केली. त्यानंतर वस्तीवरील माणसे तेथे जमली. तिच्या चुलत आजोबांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. तोपर्यंत जितेंद्र शिंदे पसार झाला होता. 
त्याबाबत पीडित मुलीच्या चुलत्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होताच संपूर्ण जिल्हाभर घटनेची माहिती पसरली. पोलिसांनी दुसऱ्या दिवशी आरोपी जितेंद्र शिंदे याला श्रीगोंदे येथून ताब्यात घेतले होते. परंतु, एकटा आरोपी इतका निर्दयीपणे बलात्कार आणि खून करून शकत नाही, अशी शंका पोलिसांना आली. त्यानंतर पोलिसांनी अन्य आरोपींचा शोध घेतला. मुख्य आरोपी शिंदे याच्याबरोबर गेल्या आरोपी संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले. जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ, नितीन भैलुमे यांनी 11 जुलै 2016 रोजी सायंकाळी पीडित मुलीची छेड काढल्याचे तपासात समोर आले. 
पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून 16 जुलै रोजी न्यायालयात हजर केले. गुन्ह्याचा तपास करून पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे यांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. दरम्यान, सरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली. दोषारोपत्र दाखल झाल्यानंतर आरोपीवर कट रचून बलात्कार व खून केल्याचा आरोप ठेवण्यात यावा, अशी मागणी निकम यांनी केली. 
तपासात मुख्य भूमिका 
कोपर्डी खून खटल्याच्या तपास तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालिन निरीक्षक शशिराज पाटोळे, कर्जतचे तत्कालिन निरीक्षक बाजीराव गावारे, सहायक पोलिस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे व राहुलकुमार पवार, पोलिस नाईक विष्णू घोडेचोर, पोलिस कॉन्स्टेबल सूरज वाबळे यांनी विशेष परिश्रम घेऊन तब्बल 70 साक्षीदारांचा समावेश असलेले 320 पानांचे दोषारोपत्र सादर केले. 


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *