👁 5 Views

पोराचे राक्षसी कृत्य, दारुसाठी पैसे न दिल्यानं आईचाच केला खून

 

नागपूर; दारूच्या व्यसनात दुसरे काही सूचत नाही. व्यसन पूर्ण करण्यासाठी व्यक्ती कोणतीही पातळी गाठू शकतो, अशीच एक घटना नागपुरात घडली आहे.



रक्ताच्या नात्यांमध्येदेखील द्वेष, विखार वाढत चालला आहे आणि यातूनच अनेकदा गुन्हेदेखील घडताना दिसून येतात. नागपुरातील यशोधरानगरात रविवारचा दिवस थरकाप उडविणारा ठरला. बेरोजगार आरोपीला स्वतःच्या आईपेक्षा नशा देणारी दारू जास्त महत्त्वाची वाटली आणि आईने दारुसाठी पैसे न दिल्याने संतापून त्याने जन्मदात्रीवरच विळ्याने वार केले. अक्षरश: राक्षसी कृत्य करत त्याने आईचाच गळा चिरत तिचा खून केला. त्यानंतर दारुची नशा उतरल्यावर त्याने स्वतःच पोलीस ठाणे गाठलं आणि केलेल्या कृत्याची माहिती पोलिसांना दिली.


गोविंद संतराम काटकर (वय 32, वनदेवीनगर) असे आरोपीचे नाव असून विमलाबाई संतराम काटकर (वय 60) असे दुर्दैवी मृत आईचे नाव आहे. आरोपी गोविंदला दारूचे व्यसन असून त्याच्या या सवयीमुळे कुणीही त्याला जास्त दिवस कामावर ठेवत नाही. काही वेळा मजूर म्हणूनही तो काम करतो.

 त्याच्या कुटुंबात आईशिवाय मोठा भाऊ आहे. मोठा भाऊ सुमारे दहा वर्षांपासून पत्नी आणि मुलांसह कळमना येथे राहतो. दारूच्या व्यसनामुळे गोविंदला काही दिवस काम मिळत नव्हते. तो आई विमलाबाई यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागायचा. पैसे न दिल्याने गोविंद त्याच्या आईलाही मारहाण करायचा.


रविवारी सकाळी दहा वाजता गोविंदने विमलाबाईंकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. सुरुवातीला आईने त्याला काहीच प्रतिसाद दिला नाही. 

गोविंदकडून सतत छळ होत असल्याने त्यांनी घरच्या आर्थिक परिस्थितीचा हवाला देत पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे गोविंदला राग अनावर झाला आणि त्याने घरातील विळा घेत आईकडे धाव घेतली. त्याने विळ्याने आईचा गळा चिरला. यात विमलाबाई या रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि आचके देत त्यांचा जागीच मृत्यू झाला

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *