Solapur Loksabha Election : हिंदूंना आतंकवादी म्हणणाऱ्या काँग्रेसला पराभूत करा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आवाहन : राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला प्रचंड प्रतिसाद

Loading

 

सोलापूर : प्रतिनिधी

देशातील नक्षलवाद, आतंकवाद, गरिबी, भ्रष्टाचार, असुरक्षितता यांचे मूळ काँग्रेस आहे. प्रभू श्रीरामांचे अस्तित्व नाकारणाऱ्या आणि हिंदूंना आतंकवादी म्हणणाऱ्या काँग्रेसला सोलापूरकरांनी पराभूत करावे, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ बुधवारी वल्ल्याळ मैदानावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रचंड मोठी जाहीर सभा झाली. योगी आदित्यनाथ यांचे भाषण ऐकण्यासाठी भर दुपारी ही हजारो सोलापूरकरांनी गर्दी केली होती. 

यावेळी व्यासपीठावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खा. डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, माजी सहकारमंत्री आ. सुभाष देशमुख, माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. समाधान आवताडे, आ. संजय शिंदे, भाजपाचे लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख, किशोर देशपांडे, भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते, शहराध्यक्ष नरेंद्र काळे, शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे, जिल्हाप्रमुख मनीष काळजे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण, मनीष देशमुख, प्रणव परिचारक, शिवानंद पाटील, शहर सरचिटणीस रोहिणी तडवळकर, विशाल गायकवाड, रूद्रेश बोरामणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते किसन जाधव उपस्थित होते.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नाने आणि समाजाच्या सहयोगाने तीर्थक्षेत्र श्री अयोध्येत बनलेले भव्य श्रीराम मंदिर हे भारताच्या राष्ट्रमंदिराचे चित्रण प्रस्तुत करत आहे. समाज जर एकत्र झाला तर कोणतीही ताकद रोखू शकत नाही हे श्रीराम मंदिराने दाखवून दिले आहे. काँग्रेस हिंदूंच्या आस्थेचा सन्मान करू शकत नाही. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, हिंदू आतंकवाद हा शब्द रूढ करताना देशाचे गृहमंत्री कोण होते ? आणि आज त्यांच्याच परिवारातील सदस्य निवडणूक लढवीत आहेत. काँग्रेसच्या या रक्ताळलेल्या पंजापासून सावध रहा, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.

काँग्रेस काळात नेमण्यात आलेल्या रंगनाथ मिश्रा कमिटीने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी यांच्या आरक्षणातून सहा टक्के आरक्षण मुस्लिमांना देण्याची शिफारस केली होती. तसेच काँग्रेस काळात नेमण्यात आलेल्या सच्चर कमिटीनेही हिंदूंवर आघात करणाऱ्या शिफारशी केल्या होत्या. सच्चर कमिटीलाही भाजपाने विरोध केला. आरक्षणाला धक्का लावण्यासाठी काँग्रेसने कट केला. मात्र भारतीय जनता पार्टी हिंदूंचे आरक्षण इतरांना देऊ देणार नाही. हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे काँग्रेसचे मनसुबे पूर्ण होणार नाहीत.

भारतीय जनता पार्टी देशाबद्दल बोलते तर काँग्रेस परिवाराबद्दल बोलते. सोलापूरकरांचे एक मत चुकीच्या दिशेने गेले तर पुन्हा आतंकवादाचे नवे पर्व सुरू होईल. पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही. सोलापूरकरांनी भारतीय जनता पार्टीला मत दिले तर आत्मनिर्भर आणि विकसित भारताची परिकल्पना साकार होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानाची पूजा करतात. नव्या संसदेच्या उद्घाटनावेळी जाताना पंतप्रधान नरेंद्र मोदी डोक्यावर संविधान घेऊन गेले. या उलट काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वाधिक अपमान केला. सोलापूरकरांनी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहनही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रसंगी केले.

आजवरची सर्वाधिक विकासकामे भाजपच्या काळात

स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक मोठी विकासकामे भाजपच्या काळात झाली आहेत, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. २५ कोटी नागरिक गरिबी रेषेच्या बाहेर आले, ८० कोटी जणांना मोफत अन्नधान्य मिळाले, आठ कोटी लोकांना आयुष्यमान भारत सुविधा मिळाली, ५० कोटी जनतेची जनधन खाती

उघडण्यात आली, १२ कोटी शेतकऱ्यांना किसान सन्माननिधी मिळाला, १२ कोटी घरांमध्ये शौचालयांची निर्मिती झाली, १० कोटी घरांमध्ये उज्वला योजनेच्या माध्यमातून मोफत गॅस जोडणी मिळाली, चार कोटी जणांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घर मिळाले, अडीच कोटी घरांमध्ये वीज जोडणी मिळाली अशी विकासकामांची यादीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोलापूरकरांसमोर सादर केली.

—————

भगवे वातावरण, प्रचंड गर्दी आणि जल्लोष 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भाषण ऐकण्यासाठी तरुणाईने प्रचंड मोठी गर्दी केली होती. योगी आदित्यनाथ मैदानात येण्यापूर्वीपासूनच भगवे झेंडे, जय श्रीराम, जय भवानी – जय शिवराय जय अशा घोषणांनी मैदान दुमदुमून गेले होते. त्यामुळे वातावरण भगवे झाले होते. योगी आदित्यनाथ व्यासपीठावरती येताच सोलापूरकरांनी योगी, योगी असा एकच जयघोष करून जल्लोष केला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *