नाशिक: संसदेत आम्ही खासदार देश हितापेक्षा एकमेकांचे कपडेलत्ते आणि इतर सगळ्या गोष्टींबाबत चर्चा करतो अशाप्रकारचं परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी मांडलं.
यशस्वीनी सामाजिक अभियान संस्थेच्या वतीनं आयोजित आनंदीचा उत्सव या महिला युवतींच्या मेळाव्यात सुप्रिया सुळे बोलत होत्या. संसदेत खासदार शाळेतल्या विद्यार्थ्यांसारखेच वागतात. पहिली दोन-चार भाषणं ऐकल्यानंतर संसदेत आम्ही गप्पा टप्पा करतो, टीव्हीवरील कार्यक्रमांची चर्चा करतो. त्यामुळं आम्हा खासदारांना संसदेत चर्चा करताना बघून लोकांना वाटतं की देशातल्या महत्वाच्या विषयांवर आमची चर्चा सुरू आहे.
‘तुझी साडी कुठून आणली, माझी कुठून आणली यावर आम्ही गप्पा मारतो’
‘मी जेव्हा संसदेत जाते तेव्हा पहिलं भाषण ऐकते, दुसरं ऐकते, तिसरं ऐकतो. चौथ्या भाषणात पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या भाषणात जे बोललं असतं तेच तो माणूस बोलत असतो. तुम्ही मला विचारलं काय भाषण केलं. तर मला चौथ्या भाषणाबद्दल काही सांगता येत नाही. आम्ही अगदीच वेळ मारुन नेतो. नाहीतर कुठल्या तरी खासदाराशी गप्पा मारत बसतो. आमच्याकडे ते चालतं जे तुमच्या वर्गात चालत नाही.’
‘खासदारांशी गप्पा मारत असताना वरुन सगळे बघत असतात, कॅमेऱ्याची नजर तुमच्याकडे असते. तुमच्यासारख्या लोकांना काय वाटतं देशाची चर्चा करतात. वाटतं ना?
‘समजा, मी चेन्नईच्या खासदाराशी बोलत असेल, तर तुम्ही म्हणत असणार बापरे, ताई कायतरी चेन्नईच्या खासदाराशी एवढा पाऊस झाला यावर मोठी चर्चा करत असणार. तशी काही चर्चा आम्ही करत नाही. तुझी साडी कुठून आणली, माझी कुठून आणली. अशा सगळ्या गप्पा होत असतात.’
कायमच संयमी भाषण करणाऱ्या सुप्रिया सुळेंनी मात्र, या कार्यक्रमात काल तुफानी बॅटिंग केली. मात्र, त्यांच्या या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.