
सोलापूर : शेळगी येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरात प्रथमच तांदूळ पूजा करण्यात आली. यानिमित्ताने श्री सिध्देश्वर यात्रेतील नंदीध्वजांचेही पूजन करण्यात आले. यावेळी मनपा परिवहनचे माजी सभापती महादेव पाटील, नगरसेवक अविनाश पाटील, चंद्रकांत रमणशेट्टी, संजय कोळी, राजशेखर पाटील, रमेश पाटील, केदार पाटील, रवी पाटील, सुरेश हत्ती, राजशेखर रोडगीकर आदी उपस्थित होते.
गुजराती मित्रमंडळातर्फे
रक्तदान शिबीर
सोलापूर : सोलापूर गुजराती मित्रमंडळाच्या वतीने रविवार, दि. १0 जानेवारी रोजी सकाळी ९.३0 ते १२.३0 या वेळेत गुजरात भवन व गांधीनगर येथील पी. पी. पटेल कारखान्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात रक्तदात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दुचाकीच्या धडकेत
पादचारी जखमी
सोलापूर : बीएसएनएल कार्यालयाजवळून चालत जाणारे भीमा ज्ञानदेव सुरवसे या पादचार्यास बुधवारी मागून येणार्या दुचाकीस्वाराने धडक देऊन जखमी केले. याबाबत प्रकाश जाधव (रा. लोखंडवाला अपार्टमेंट) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सदर बझार पोलिसांनी दुचाकी चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
अपहार केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा
सोलापूर : कार्यालयातील व्यवस्थापकाकडून घेतलेली ५९ हजार ९९८ रुपयांची रोख रक्कम संबंधित व्यक्तीला न देता, दिल्याची नोंद करून अपहार केल्याप्रकरणी अजय मल्लिकार्जुन सारवाड (वय १९, रा. राठी चाळ, भवानी पेठ) याच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संजय सूर्यनारायण रघोजी (वय ४९, रा. १९४ डी, सम्राट चौक) यांनी फिर्याद दिली आहे. तपास सहायक फौजदार माने करीत आहेत.
बेकायदा गॅस विक्री करणार्या दोघांविरूद्ध गुन्हा
सोलापूर : भावसार पथ येथे घरगुती वापराचा गॅस बेकायदा विक्री करणार्या खुद्दबोद्दिन अहमद नदाफ (वय ५३, रा. ७५९, उत्तर कसबा) व अक्रम रशीद शेख (वय २३, रा. ८२, ताई चौक) हे दोघे वेगवेगळ्या ठिकाणी गॅसचा काळाबाजार करताना आढळून आल्याने दोघांविरूद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुद्दबोद्दिन नदाफ याच्याकडून तीन गॅसटाक्यांसह सात हजार १00 रूपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. अक्रम शेख याच्याकडून तीन गॅसटाक्यांसह नऊ हजार १00 रूपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.