सोलापूरमधील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विष्णुपंत कोठे यांचे निधन

Loading

सोमवार, 18 जानेवारी 2016

सोलापूर – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विष्णुपंत गणपतराव कोठे (वय 80, रा. राधाश्री निवास, मुरारजी पेठ, सोलापूर) यांचे काल सकाळी आठच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रात्री साडेदहा वाजता पुणे नाक्याजवळील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात मुलगा माजी महापौर महेश कोठे, मुलगी राधिका चिलका, नातू नगरसेवक देवेंद्र कोठे, डॉ. सूरज कोठे, प्रथमेश कोठे यांच्यासह सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून विष्णुपंत कोठे हृदयविकाराने त्रस्त होते. त्यांना उपचारासाठी पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी आणले होते. सध्या सुरू असलेल्या सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्‍वर यात्रेत पहिल्या दिवशी त्यांनी नंदीध्वजाला चांदीचे बाशिंग बांधून यात्रेत सहभाग नोंदवला होता. शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे ते झोपी गेले होते. त्यानंतर रविवारी पहाटे ते उठले. नित्य देवपूजा आटोपल्यानंतर ते पुन्हा झोपी गेले. आज सकाळी आठच्या सुमारास त्यांचे निधन झाले.

डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मारकाची उभारणी, डॉ. निर्मलकुमार फडकुले यांच्या नावाने साहित्य आणि समाजसेवा पुरस्कार देण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यांनी गोरगरिबांच्या मुलांसाठी संभाजीराव शिंदे शैक्षणिक संकुलाची स्थापना केली. सोलापूरच्या मागील 35-40 वर्षांच्या जडणघडणीमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या राजकीय जडणघडणीमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. शिंदे आणि कोठे यांची मैत्री संपूर्ण महाराष्ट्राला परिचित होती. शिंदे नेहमीच सत्तेत असताना त्यांचे सोलापुरातील लोकसंघटन आणि जनसंपर्क कायम ठेवण्याचे काम केल्या 35 ते 40 वर्षांपासून कोठे हेच करत होते. शिंदे हे राज्यासह देशाच्या राजकारणात आणि सत्ताकारणात असताना सततच्या व्यस्त कामकाजामुळे ते सोलापूरला फारसा वेळ देऊ शकत नव्हते. असे असतानाही कोठे यांनी सोलापूरकरांना शिंदे यांची उणीव कधीही भासू दिली नाही.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *