रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण, अशोक वाजपेयींकडून डी. लिट परत

Loading

नवी दिल्ली : सुप्रसिद्ध कवी अशोक वाजपेयी हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाकडून मिळालेली डी. लिट पदवी परत करणार आहेत. हैदराबाद विद्यापीठातील पीएचडी स्कॉलर असलेल्या रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर वाजपेयी यांनी हा निर्णय घेतला आहे.
 अशोक वाजपेयी यांनी दादरी प्रकरणानंतर साहित्य अकादमी पुरस्कारही परत केला होता. त्यानंतर हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाकडूनच त्यांना बहाल केलेली डी लिट पदवी त्यांनी परत करण्याचा निर्णय घेतला आहे.रोहित वेमुला याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री बंडारु दत्तात्रय यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. चौकशी समिती संपूर्ण प्रकरणाचा तपास करुन अहवाल सुपूर्द करणार आहे.
 काय आहे प्रकरण ?
 केंद्रीय मंत्री बंडारु दत्तात्रेय यांनी स्मृती इराणींना एका पत्र लिहून हैदराबाद केंद्रीय विद्यापीठ हे जातीयवादी, उग्रवादी आणि राष्ट्रविरोधी राजकारणाचा अड्डा झाल्याची खोटी माहिती दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या पत्रानंतरच विद्यापीठ प्रशासनाने पाच विद्यार्थ्यांची हॉस्टेलमधून हकालपट्टी केली. यापैकी रोहित वेमुला या विद्यार्थ्याने रविवारी संध्याकाळी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.रोहित वेमुला याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी बंडारु दत्तात्रेय यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला आहे. मात्र दत्तात्रेय यांनी त्या पत्राचा आत्महत्या केलेल्या रोहितशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला आहे.मुंबई बॉम्बस्फोटांचा दोषी याकूब मेमनला फाशी झाली त्यावेळी माकपशी संबंधित विद्यार्थी संघटना एसएफआयच्या काही कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतर काही दलित विद्यार्थ्यांवर दुसऱ्या एका विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा आरोप झाला. संबंधित विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्यानंतर त्याच्या आईने कोर्टात धाव घेतली. यानंतर या प्रकरणाला सुरुवात झाल्याचं म्हटलं जातं.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *