भाजपाच्या खेळीने शिवसेनेची कोंडी

Loading

    • मुंबई : खेळाचे मैदान व उद्यानांच्या देखभालीसाठी मंजूर धोरणाला स्थगिती दिल्यानंतर भाजपाने सोमवारी स्वपक्षीय नेत्याच्या ताब्यात असलेले भूखंडही परत करीत शिवसेनेला शह दिला़ भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी आपल्या संस्थेला काळजीवाहू तत्त्वावर मिळालेले उद्यान व मैदानांचा ताबा आयुक्तांकडे दिला़ मित्रपक्षाच्या या खेळीमुळे शिवसेनेची मात्र कोंडीच झाली आहे़
      खेळाचे मैदान व उद्यानाचे नवीन धोरण पालिका महासभेत बहुमताने मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यास स्थगिती दिली़ त्यामुळे आधी शिवसेनेच्या सुरात सूर मिसळणाऱ्या भाजपा नेत्यांना आपलेच शब्द फिरवत मंजूर धोरणावर फेरविचार करण्याची मागणी करावी लागली़ मात्र काळजीवाहू तत्त्वावर दिलेल्या भूखंडांपैकी काही भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांच्या संस्थेकडे असल्याने भाजपाचे हातही दगडाखाली होते़
      भाजपाला कोंडीत पकडण्याची संधी शिवसेनेकडे होती़ मात्र खासदार शेट्टी यांनी आपल्या ताब्यातील सर्व मैदाने व उद्यानांचा ताबा १ फे्रबुवारी २०१६पासून सोडणार असल्याचे जाहीर करीत शिवसेनेला धक्का दिला़ दुसरीकडे मनसे आणि काँग्रेसने शिवसेना नेत्यांना त्यांच्या ताब्यातील मैदाने व उद्याने परत करण्याचे आव्हान दिले़ दरम्यान, हे धोरण अंमलात येऊ नये, यासाठी ठेकेदारांची लॉबी सक्रिय असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला़ मात्र भाजपाचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड़ आशिष शेलार यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी या धोरणाला स्थगिती दिल्याचे त्यांना स्मरण करून देताच शेट्टी यांनी विषयाला बगल दिली़ १२ लाख रुपये सदस्यत्व असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शरद पवार यांना जाब का नाही विचारत, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला़ मात्र भाजपाचे शेलार मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणताच शेट्टी यांनी विषय टाळला़
      पोयसर जिमखानाच्या सदस्यत्वासाठी घेतलेल्या निधीतून जमा झालेले १० कोटी रुपये बँकेत ठेवून त्याच्या व्याजातूनच उद्यानांची देखभाल होत आहे़ लोकांना मैदानं विनामूल्यच उघडून द्यावी, पण ते पालिकेने शक्य करून दाखवावे, असे आव्हानही शेट्टी यांनी दिले़

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *