ज्येष्ठ पत्रकार टिकेकर यांचे निधन

Loading


मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि साहित्यिक डॉ. अरुण टिकेकरयांचे मंगळवारी सकाळी वांद्रे येथील राहत्या घरी निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी प्रा. मनीषा टिकेकर, मुलगा आशुतोष, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. टिकेकर यांच्या पार्थिवावर दुपारी शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मागच्या काही दिवसांपासून टिकेकर यांना श्वसनाचा त्रास होता. टिकेकर यांच्या निधनामुळे महाराष्ट्र एका व्यासंगी विचारवंतास मुकला, अशी भावना व्यक्त झाली.
डॉ. टिकेकर यांनी आपली कारकिर्द महाविद्यालयात व्याख्याता म्हणून सुरू केली. लेखन, वाचन, भाषा, संशोधन आणि साहित्याचा गाढा व्यासंग असलेल्या टिकेकरांनी दिल्लीतील यूएस लायब्ररी आॅफ काँग्रेस आॅफिसमध्ये काम केले. त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात ‘टाइम्स’पासून झाली. प्रारंभी तेथे संदर्भ ग्रंथालयात काम केल्यानंतर कालांतराने ते ‘लोकसत्ता’च्या संपादकपदी रुजू झाले. ‘लोकमत’, ‘सकाळ’ या दैनिकांमध्येही त्यांनी संपादकपद भूषवले होते. त्यांचा व लोकमतचा संबंध त्या दोहोंचीही ऊर्जा, प्रतिष्ठा व लोकप्रियता उंचावणारा ठरला, अशी भावना लोकमत मीडियाचे चेअरमन खा. विजय दर्डा यांनी व्यक्त केली. तर लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांनी टिकेकरांच्या निधनाचे वृत्त समजताच परदेशातून शोक संवेदना व्यक्त केल्या. टिकेकर यांनी मुंबई विद्यापीठाचा रंजक इतिहास लेखणीबद्ध केला आहे. टिकेकर यांची ओळख एक व्यासंगी व मूल्य जोपासणारा प्रामाणिक पत्रकार अशीच राहिली. एकोणीसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासाचे अभ्यासक म्हणूनही त्यांचे नाव आदराने घेतले जाते.

टिकेकरांना अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता. एशियाटिक सोसायटीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. राजकारण्यांवर होणाऱ्या टीका-टिप्पणीसंबंधी नियमावली हवी, अशी त्यांची भावना होती. राजकीय नेत्यांवर चुकीच्या पद्धतीने टीका केल्यास कायदेशीर कारवाईसाठी कायदा तयार करावा, असे मत ते आग्रहपूर्वक मांडत असत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *