रोम : ओसटाना हे उत्तर इटलीमधील एक छोटंसं शहर. ओसटाना या छोट्या शहराची सध्या जगभर चर्चा सुरु आहे. निमित्तही चर्चा होण्यासारखंच आहे. गेल्या आठवड्यात ओसटाना शहरातील तुरिन हॉस्पिटलमध्ये एक मूल जन्माला आलं.

पाब्लो असं या मुलाचं नाव आहे. याच्या जन्मानंतर अख्ख्या ओसटाना शहरात जल्लोषाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. एखाद्या सण-उत्सवासारखं या मुलाचा जन्म साजरा केला जातो आहे. शहराच्या प्रवेशद्वारावर करकोचा पक्षाची प्रतिकृती तयार करुन लावण्यात आली आहे. ज्या
पाईडमांटच्या डोंगररांगांमध्ये ओसटाना शहर वसलं आहे. या शहराचे महापौर गियाकॉमा लॉमबारडोही पाब्लोच्या जन्मानंतर प्रचंड आनंदी आहेत. डोंगररांगांमधील या छोट्याशा शहरात या मुलाचा जन्म म्हणजे एखाद्या स्वप्नासारखं आहे, अशा भावना गियाकॉमा लॉमबारडोही यांनी व्यक्त केल्या.
गेल्या शतकभरापासून ओसटाना शहराची लोकसंख्या कमालीची घटत चालली आहे. पाब्लोच्या जन्मानंतर या शहराची संख्या 85 वर पोहोचली आहे. या लोकसंख्येतीलही अर्धीच लोकसंख्या कायमस्वरुपी ओसटानामध्ये राहते.
महापौर लॉमबारडो सांगतात, “19 व्या शतकच्या सुरुवातीला ओसटाना शहर एकूण एक हजार लोकसंख्येची वस्ती होती.”
दुसऱ्या महायुद्धानंतर ओसटानामधील जन्मदर कमी होत गेला. 1975 नतंर ओसटानातील जन्मदर कमालीचा कमी झाला. 1976 ते 1987 या वर्षांदरम्यान 17 मुलांचा जन्म झाला. त्यानंतर तब्बल 28 वर्षांनी म्हणजे आता 2016 साली पाब्लोचा जन्म झाला आहे.
लोकसंख्येशी लढण्यासाठी ओसटानाने नव-नव्या योजना आणल्या. मात्र, त्यांचा फारसा परिणाम झालेला दिसला नाही.
पाब्लो ज्यांच्या घरी जन्माला आला, तेही पाच वर्षांपूर्वी परदेशात जाण्याच्या विचारात होते. मात्र, जवळच्या डोंगरांमध्ये राहण्याची सुविधा मिळाली आणि ते तिथेच थांबले.
द नेशनल यूनियन ऑफ माऊंटेन टॉउन्स अँड कॉम्युनिटिजचे मारको बसॉने यांनी सांगितले, “पाब्लो ज्यांच्या घरात जन्माला आला, त्या घराचं भविष्य उज्ज्वल आहे. त्याचा जन्म हे याच गोष्टीचे संकेत आहेत.”
ओसटाना हे एकमेव शहर नाही, इटलीमध्ये अशी अनेक शहरं आहेत, जिथे कमी लोकसंख्या आहे. येथील अधिकाधिक तरुणवर्ग नोकरीच्या निमित्ताने मोठ्या शहरांकडे स्थलांतरित होऊ लागला आहे. स्थलांतराला रोखण्यासाठी मोफत घरं देण्यासही येथील अनेक लोक तयार आहेत. मात्र, स्थलांतर थांबता थांबत नाही आणि पर्यायाने कमी लोकसंख्येचा मुद्दा भेडसावत आहे.