![]()
नाशिक : शेतीमध्ये अभिनव प्रयोग करणाऱ्या राज्यातील रत्नांचा ‘एबीपी माझा’तर्फे ‘शेती सन्मान’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. प्रगतीशील शेतकऱ्यांना ‘शेती सन्मान’ देऊन त्यांच्या कार्याला एबीपी माझा’ने सलाम केला.
तीन पिढ्यांपासून देशी गायी संवर्धन करणारे इंदापूरचे माजिद पठाण, ऊसतोड कामगारांच्या बीड जिल्ह्यात गटशेतीचं महत्त्व रुजवणारे वैजनाथ कराड, कोकणाच्या मातीत केळीसारखं नगदी पीक घेणारे लांजा-रत्नागिरीचे रणजीत खानविलकर, शेतकऱ्यांची कंपनी उभारणारे उस्मानाबादचे कैलास पाटील आणि टीम, जळगावच्या केळी प्रक्रिया उद्योजिका शोभा वाणी, सेंद्रीय शेती पिकवणारे कोल्हापूरचे प्रताप चिपळूणकर, शेती शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉक्टर सी.डी. मायी, सांगलीचे बकरी पंडित – रायणराव देशपांडे नाआणि आयुष्यभर शेतीत नवनवे संशोधन करणारे चंद्रपूरचे दादाजी खोब्रागडे यांना ‘शेती सन्मान’ पुरस्काराने गौरवण्यात आलं.
शेती क्षेत्रात काम करणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न म्हणजे माझा शेती सन्मान पुरस्कार
बाजारू शेतीने आत्महत्या वाढल्या : राजेंद्र सिंह
भारत हा समुद्र देश आहे. मात्र भारतात आणि महाराष्ट्रात बाजारू शेतीने आत्महत्या आणल्याचा दावा जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी केला.
“अधिकाधिक नफा मिळवण्याच्या प्रयत्नात जमीनीचं आणि निसर्गाचं चक्र बिघडवून टाकलं. त्यामुळे बाजारात शुभ-लाभाची चिंता निर्माण झाली. जिथे जास्त लाभाची चिंता, तिथेच आत्महत्या वाढल्या”, असं राजेंद्र सिंह म्हणाले.
याशिवाय महाराष्ट्रात ‘नाम’ संस्थेमार्फत नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे हे उत्तम काम करत आहेत. त्यांच्या कार्यात आपण स्वत:ही सहभागी होऊया. ‘नाम’साठी मी दिवस-रात्र कधीही हजर आहे, केवळ हाक द्या, असं राजेंद्र सिंह म्हणाले.
कोणाचेही धन्यवाद नाही, सर्वांचं कर्तव्य: नाना पाटेकर
यावेळी अभिनेता नाना पाटेकर म्हणाला, “शेती आणि शेतकऱ्यांसाठी जे कोणी काही करतंय त्यांना मी धन्यवाद म्हणणार नाही, ते सर्वांचं कर्तव्य आहे. शुक्रगुजार हूँ ये नही कहूँगा, ये हमारी जिम्मेदारी है, निभाता रहूँगा. आम्ही ‘नाम’ संस्थेमार्फत आमचं कार्य करत राहू. आम्हाला अनेकजणांची साथ मिळत आहे. आयुष्यात जितके सन्मान मिळाले, त्यापेक्षा जास्त सन्मान ‘नाम’चं काम करताना मिळाले”.
याशिवाय ‘नाम’मार्फत 300 किमीच्या नद्या, नाल्यांचं पुनर्विकासाचं आम्ही करतोय. महाराष्ट्रातलाच नव्हे तर देशातला शेतकरी आपला आहे, सर्वांना पुढे नेऊया, असं आवाहन नानाने केलं.
तसंच ‘जय हिंद’ या शब्दाला मर्यादित करू नका, यामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई सगळे आहेत, असंही नानाने नमूद केलं.
कार्यक्रमादरम्यान ‘फिनोलेक्स पाईप्स’कडून नाना पाटेकरचा सन्मान करण्यात आला. नाना यावेळी गुगली टाकत म्हणाला, मला भेटच द्यायची असेल तर शेतकऱ्याला कमी दरात पाईप द्या.
मकरंद अनासपुरेकडून कौतुक
शेतकऱ्यांच्या सन्मानाचा कार्यक्रम एबीपी माझाने केला, त्याबद्दल अभिनंदन, असं म्हणत अभिनेता मकरंद अनासपुरे कौतुक केलं. शेतकऱ्यांच्या व्यथा जशा मांडल्या जातात, तसंच त्यांच्या प्रेरणादायी कहाण्याही लोकांसमोर जाणं आवश्यक असल्याचं मकरंद म्हणाला.


