नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी 2016
मेक इन इंडिया उपक्रमाला अधिक गती देण्यासाठी, भारताच्या निर्मिती क्षेत्रातील कामगिरीचे जगाला दर्शन घडवण्यासाठी आणि जागतिक स्तरावर भारताला पहिल्या पसंतीचे निर्मिती केंद्र म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या “मेक इन इंडिया” सप्ताहासाठी भारताची आर्थिक राजधानी सज्ज झाली आहे. उत्साहाने सळसळणाऱ्या मुंबईत होणाऱ्या या सप्ताहात भारतातील तसेच जगभरातील नेते, द्रष्टे, शिक्षणतज्ञ, केंद्र आणि राज्य प्रशासन यांना एकत्र येण्याची संधी मिळणार आहे.
धोरणकर्ते, उद्योजक, शिक्षणतज्ञ यांना एकत्र आणणाऱ्या आणि भारताच्या नवीन उत्पादन क्रांतीला चालना देणाऱ्या मनुष्यबळ, धोरणे आणि भागीदारी यावर भर देणारा हा सप्ताह भारताच्या निर्मिती क्षेत्रासाठी अभिमानास्पद आहे आणि सार्वजनिक आणि खासगी भागीदारी नव्या उंचीवर घेऊन जाणारा आहे. पंतप्रधानांनी जगभरातील गुंतवणूकदारांना “मेक इन इंडिया” साठी आमंत्रित केले असून या भव्य कार्यक्रमाचे ते उद्घाटन करतील. यामध्ये 49 देशांचे सरकारी प्रतिनिधी मंडळ आणि 68 देशांचे उद्योग प्रतिनिधीमंडळ सहभागी होणार आहेत. भारताच्या निर्मिती सामर्थ्याचे दर्शन घडवणाऱ्या या आठवडाभर चालणाऱ्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत आयोजित पत्रकार परिषदेत वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, निर्मितीला चालना देण्यासाठी सरकारने नियमितपणे अनेक धोरणात्मक उपाययोजना केल्या आणि आज भारतातील थेट परदेशी गुंवतणूक 48 टक्क्यांनी वाढली आहे तर जागतिक स्तरावर मोठी घसरण झाली आहे. भारताच्या सावरलेल्या अर्थव्यवस्थेला जगभरातील उद्योग समुदायांनी उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला असून मेक इन इंडिया सप्ताहामुळे देशाच्या निर्मिती क्षेत्रातील कामगिरीचे दर्शन घडेल आणि भारताला गुंतवणूक, अभिनवता आणि निर्मिती केंद्र म्हणून अढळ स्थान प्राप्त करुन देईल.
मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्यासाठी आणि विकासाचा उच्च दर साध्य करण्यासाठी देशाच्या क्षमतेचा पूर्ण वापर करण्यासाठी राज्यांसोबत भागीदारी करण्याच्या केंद्र सरकारच्या दृष्टिकोनाकडे लक्ष वेधताना त्यांनी सांगितलं की उत्पादन क्रांतीच्या निर्मितीमध्ये आणि ती कायम राखण्यात राज्यांची महत्त्वाची भूमिका आहे आणि सहकारी तसेच स्पर्धात्मक संघीयवादाच्या भावनेतून ते विकासाचे चालक असतील आणि केंद्र सरकार योगवहनाची भूमिका पार पाडेल.
यजमान महाराष्ट्र राज्याच्या राजधानीत होणाऱ्या या सप्ताहात अनेक उद्योगविषयक कार्यक्रम आणि गुंतवणूकदार परिषदा होणार आहेत. संपूर्ण जग भारताकडे विश्वासार्ह गुंतवणूकीचे स्थान म्हणून पहात असल्यावर भर देत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की सर्वात मोठे निर्मिती केंद्र बनण्यासाठी भारत सज्ज आहे. ते पुढे म्हणले की, मेक इन इंडिया सप्ताहामध्ये जगभरातील गुंतवणूकदार महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीचे नवीन मार्ग शोधणारे असतील आणि देशाच्या आर्थिक राजधानीत हा कार्यक्रम होत असल्यामुळे देशी आणि परदेशी गुंतवणूकदारांसाठी राज्याची पहिली पसंती म्हणून तसेच भारताबरोबर आर्थिक आणि बौध्दिक संबंध दृढ करण्यासाठी प्रवेशद्वार म्हणून महाराष्ट्राचे स्थान अधिक मजबूत होईल. प्रमुख सरकारी प्रतिनिधीमंडळांमध्ये फिनलँड, स्वीडन आणि लियुआनिया या देशांच्या पंतप्रधानांच्या नेतृत्चाखालील प्रतिनिधीमंडळ आणि पोलंडच्या उपपंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधीमंडळाचा समावेश आहे. उच्च स्तरीय सरकारी प्रतिनिधींबरोबर मोठ्या संख्येने उद्योग प्रतिनिधीही असतील.
यावेळी केंद्र सरकारच्या औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाचे सचिव अमिताभ कांत म्हणाले की जागतिक परदेशी गुंतवणुकीतला हिस्सा वाढवण्यासाठी आणि भारताला सर्वात मोठे गुंतवणुकीचे ठिकाण म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधानांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाला आणखी गती देण्यासाठी “मेक इन इंडिया सप्ताह” हा अशा प्रकारचा सर्वात मोठा प्रयत्न आहे. ते पुढे म्हणाले की, पुढील तीन दशके 9-10 टक्के वाढीचा दर कायम राखणे हे भारतासमोर आव्हान आहे. उद्योगांना पोषक वातावरण मिळाल्यास आणि उत्पादन क्षेत्राची वाढ झाल्यास हे साध्य करता येऊ शकेल. ते म्हणाले की, “मेक इन इंडिया सप्ताहाच्या” ठळक वैशिष्ट्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वांद्रे-कुर्ला संकुलात मेक इन इंडिया सेंटरचे उद्घाटन, सी एन एन एशिया बिझनेस फोरमला वित्त, उद्योग आणि संरचना क्षेत्रातील नेत्यांची उपस्थिती, उत्पादनक्षेत्रातल्या सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येणारे टाईम इंडिया पुरस्कार आणि अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांचा समावेश आहे.
हा कार्यक्रम जिथे होणार आहे त्या एम एम आर डी ए मैदानावर मेक इन इंडिया सेंटर उभारण्यात येत असून तिथे 11 क्षेत्रांतील नावीन्यपूर्ण उत्पादने आणि निर्मिती प्रक्रियेचे दर्शन घडवण्यात येणार आहे. हा परिसर पारंपारिक कलाकुसर आणि संरचना क्षेत्रातील बिनीच्या शिलेदारांद्वारे विचारपूर्वक सुशोभित केला जाणार आहे. मेक इन इंडिया सेंटरमध्ये मेक इन इंडिया सप्ताहाच्या 11 प्रमुख क्षेत्रांची क्षेत्रनिहाय दालने, 17 राज्यनिहाय प्रदर्शने आणि अनेक देशांची दालने असतील. 2,20,000 चौरस मीटर जागेवर हे सेंटर उभारण्यात येणार असून यात 27 प्रेक्षागृहे असतील. कन्ट्री पॅव्हिलियनमध्ये स्वीडन, जर्मनी आणि दक्षिण प्रदर्शनांचा समावेश असेल. 190 हून अधिक प्रदर्शक देशाच्या प्रमुख क्षेत्रांमधील निर्मितीचे सामर्थ्य पेश करतील.
या सप्ताहामध्ये संकल्पना आणि नावीन्यतेची कसोटी लागणार असून निर्मितीसंबंधित यशोगाथांबाबत उद्योजक आणि विद्वान यांच्यात संवाद साधला जाणार आहे. आय आय टी चे नावीन्यतेवर आधारित प्रदर्शनाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते मेक इन इंडिया सेंटरमध्ये होणार आहे. जगभरातील सर्वोत्तम संस्था एकत्र येऊन जल, वाहतूक आणि ऊर्जा या तीन प्रमुख क्षेत्रांमधील समस्यांवर उपाय शोधतील. भारतीय युवकांच्या उद्यमशीलता भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि अभिनवतेपासून निर्मितीपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी स्टार्ट-अप समुदायाला मदत करण्यासाठी औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभाग आणि कॉल कॉम इंडिया यांच्या वतीने भारतातील सर्वात मोठी स्टार्ट-अप स्पर्धा “Q PrizeTM Make in India” आयोजित करण्यात येणार आहे. विजेत्या कंपनीला 2 कोटी रुपयांचे पारितोषिक समभाग गुंतवणूक रुपाने देण्यात येईल. निर्मिती क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर समकालीन संरचना पध्दतींवर विचार विनिमय करण्यासाठी आणि भारताला जागतिक संरचना केंद्र म्हणून पुढे आणण्यासाठी“संरचनेच्या माध्यमातून सशक्तीकरण” यावर एका परिषदेचे आयोजन केले जाणार आहे.
आठवडाभर चालणाऱ्या या कार्यक्रमात महाराष्ट्राला गुंतवणुकीचे केंद्र बनवणे आणि मुंबईचे आर्थिक सेवांचे सामर्थ्य अधोरेखित करणे यावर केवळ भर दिला जाणार नाही तर या शहराच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शनही घडवले जाणार आहे. मुंबईतली कला दालने आणि संग्रहालये येथे ही प्रदर्शने भरवण्यात येणार आहेत. “महाराष्ट्र नाईट” हा मुख्य सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून यामध्ये मनोरंजन आणि संस्कृतीचा मिलाफ पहाता येईल तसेच महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने उप कला आणि संस्कृती शो आयोजित करण्यात आल्याचे महाराष्ट्राचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी सांगितले. वाहने, संरक्षण, अन्न प्रक्रिया, रसायने आणि पेट्रोरसायने, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती-तंत्रज्ञान, औषधनिर्माण, वस्त्रोद्योग, औद्योगिक उपकरणांची निर्मिती, पायाभूत विकास यांसारख्या क्षेत्रांमधील प्रमुख संधींचे दर्शन 21 चर्चासत्रांद्वारे घडवण्यात येणार आहे. प्रमुख केंद्रीय मंत्र्यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या या चर्चासत्रांमध्ये केंद्रीय मंत्री, औद्योगिक नेते, शैक्षणिक संस्था आणि उद्योग संस्था सहभागी होणार आहेत. या चर्चासत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रातील गुंतवणुकीच्या संधी, गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी घेण्यात आलेले धोरणात्मक निर्णय, उद्योग सुरु करण्यातील सुगमता यावर भर दिला जाणार आहे. 12 राज्य गुंतवणूकदार शिखर परिषदा (गुजरात, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, ओदिशा, छत्तीसगड, हरियाणा, मध्य प्रदेश, झारखंड, पंजाब, तेलंगण, कर्नाटक आणि तामिळनाडू) होणार असून प्रमुख क्षेत्रांचे सामर्थ्य उद्योगाला अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या उपाययोजना, स्थानिय लाभ, औद्योगिक पायाभूत सुविधा आदींची माहिती दिली जाणार आहे.
चर्चा सत्रांव्यतिरिक्त, सी एन एन, आशिया बिझनेस फोरम, टाईम इंडिया पुरस्कार, ड्रायव्हिंग इनोवेशन: हॅकेथॉन, मेक इन इंडिया: द वे फॉरवर्ड, संरचनेच्या माध्यमातून सशक्तीकरण” यावरील परिषद, “द ग्लोबल डिझाईन ॲण्ड इनोवेशन सेशन” आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.
मेक इन इंडिया सप्ताहामुळे भारतीय उद्योगांबरोबर भागीदारी आणि गुंतवणूक स्वरुपात जागतिक संबंध दृढ होण्यास मदत होईल तसंच जगातील सर्वात मोठी लोकशाही जगातील सर्वात सामर्थ्यवान अर्थव्यवस्था बनण्याचा मार्ग सुकर होईल.