आकुर्डीतून एकाला अटक : विशेष कृती दलाची कारवाई
पिंपरी, (प्रतिनिधी) – उत्तर प्रदेश मधील विविध पेट्रोल पंपांवर “मायक्रोचिप’ व “रिमोट कंट्रोल’द्वारे फेरफार करून ग्राहकांचे पाच ते दहा टक्के पेट्रोल हडप करत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष कृती दलाने रविवारी (दि. 21) आकुर्डी व ठाणे येथे छापे टाकत दोन जणांना अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी संबंधित साहित्यही जप्त केले आहे. राष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या या घोटाळ्याची पाळेमुळे पिंपरी-चिंचवडपर्यंत येऊन पोहचल्याने शहरात एकच खळबळ उडाली.
अविनाश मनोहर नाईक, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला उत्तर प्रदेश पोलिसांनी आकुर्डी येथील जय गणेश व्हिजन येथील “व्हिजिल सिस्टीम’ नावाच्या दुकानातूनच अटक केली. यावेळी त्याच्या कडून पोलिसांना 177 रिमोट कंट्रोल, 189 आर. एक्स रिसीव्हर, 50 रिमोट सेल, व एक लॅपटॉप जप्त केले. अविनाश या दुकानात इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञ म्हणून कामाला होता. नवीन इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बनविण्यात त्याचा हातखंडा होता. अनेक नवीन प्रयोग देखील तो करीत असे. गेल्या काही दिवसांत नाईक याच्या राहणीमानात खूप बदल झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला होता.
दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष कृती दलाने ठाणे येथेही कारवाई करुन विवेक हरिशचंद्र शेटे याला राहत्या घरातून अटक केली आहे. त्याच्याकडून 110 मायक्रोचीप, 21 आर. एक्स. रिसीव्हर, 24 रिमोट कंट्रोल, 14 डिसप्ले बोर्ड, 3 पल्सर एल ऍन्ड टी, 1 पल्सर निडको, लॅपटॉप, सॉफ्टवेअर जप्त केले आहेत.
लखनौत 23 जणांना अटक…
ग्राहकांनी पेट्रोलसाठी पैसे मोजले आहेत, त्यापेक्षा पाच ते दहा टक्के कमी पेट्रोल देऊन त्यांची फसवणूक करण्याचे लखनौतील पेट्रोलपंपांवरील मोठे रॅकेट उत्तर प्रदेश पोलिसांनी नुकतेच उघडकीस आणले आहे. पेट्रोल देणाऱ्या यंत्रात इलेक्ट्रॉनिक चिप बसवून लखनौ शहरातील पेट्रोलपंपांचे चालक ही फसवणूक करत असल्याचे राज्य पोलिसांच्या विशेष कृती दलाच्या (एसटीएफ) पथकाच्या तपासणीत आढळले. या प्रकरणात गुंतलेल्या 23 लोकांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. अशा प्रकारचा घोटाळा करणारे सर्व सातही पेट्रोलपंप सील करण्यात आले आहेत.
15 “चिप’ केल्या आहेत जप्त…
“एसटीएफ’च्या म्हणण्यानुसार, सुमारे 5-6 वर्षांपूर्वी दिल्लीतील काही लोकांच्या संपर्कात आल्यानंतर आपल्याला ही “चिप’ व तिच्या “फ्युएल डिस्पेन्सिंग मशीन’मधील वापराबाबत माहिती मिळाल्याचे राजेंद्रने सांगितले आहे. ही “चिप’ बसवलेल्या शहरातील अनेक पेट्रोलपंपांची नावे त्याने सांगितली आहेत. संबंधित “चिप’ एका रिमोट कंट्रोल उपकरणाच्या साहाय्याने वापरता येत होती. छापे घालण्यात आलेल्या पेट्रोलपंपांमध्ये भारत पेट्रोलियमचे पाच, तर इंडियन ऑइलचे दोन पंप आहेत. संबंधित पेट्रोलपंपांवर हजर असलेले डिलर, व्यवस्थापक किंवा रोखपाल यांच्याकडून 15 “इलेक्ट्रॉनिक चिप’ आणि 29 रिमोट कंट्रोल उपकरणे जप्त करण्यात आली होती.
…असा चालायचा घोटाळा
– पेट्रोल भरल्या जाणाऱ्या मशीनमध्ये “चिप’ बसवली जात होती.
– “चिप’ला दूरनियंत्रकाद्वारे नियंत्रित केले जात असे.
– पेट्रोल भरतेवेळी दूरनियंत्रकाचा वापर करून इंधन कमी भरले जात असे.
– संशय आल्यास “चिप’ मशीनमधून काढून घेतली जात होती.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





